नवी दिल्ली: कोरोना फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे.
समितीने असाही दावा केला आहे की भारतात कोरोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत. भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे. सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के.विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे.
या समितीने असा दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केला नसता तर देशभरात कोरोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.
कोविड एक्स्पर्ट पॅनलचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन आठवड्यांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.