कोकण, मध्यमहाराष्ट्र विदर्भात पावसाचा अंदाज; मराठवाड्यातील जोर ओसरला
पुणे: मध्य भारतातून मान्सून वेगाने दक्षिणेकडे सरकत असून त्याचा जोर २४ ऑक्टोबर नंतर संपूर्ण देशातून कमी होणार आहे. दरम्यान, बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २१ ते २४ ऑक्टोबर पर्यंत राज्यात कोकण, मध्यमहाराष्ट्र व विदर्भात काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील काही भागात सुरू असलेला पावसाचा जोर आता मंदावला आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास मध्य भारतातून सुरु झाला असून तो उत्तरप्रदेश, बिहार, पं.बंगाल, सिक्कीम, छत्तीसगड, गुजरात, उत्तर अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्र, उत्तर महाराष्ट्र या मार्गाने वेगाने दक्षिणेकडे जात आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात १९ रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाढला आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पं.बंगाल, उत्तराखंड, नागालॅन्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा या भागात मुसळधार पाऊस पडेल.
महाराष्ट्रात अरबी समुद्रातून मान्सूनचा जोर पूर्णपणे ओसरत चालला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा भागातीव पाऊस थांबला आहे. मात्र, २१ ते २४ या चार दिवसात कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भातील काही भागातच मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मान्सूनचा जोर पूर्ण देशातून २४ नंतर थांबणार आहे. असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने विशेष बुलेटिनद्वारे आज दिला आहे.