24 ऑक्टोबरपासून उत्तर मध्यमहाराष्ट्रातून होणार परतीचा प्रवास
पुणे: राज्यात ऑक्टोबर महिना संपत आलेला असताना सुध्दा मुक्कामी असलेला मान्सून दसऱ्यापासून सिमोल्लंघन करणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस सर्वच भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात मान्सून परतीचा प्रवास करतो. मात्र, यंदा तो तब्बल दोन आठवडे लांबला आहे. गेल्या आठवडा भरापासून राज्याला झोडपून काढणारा मान्सूनने अखेर बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाचे संकेत दिले आहेत. त्यानुसार दसऱ्याच्या दिवशी (दि.25) मान्सून उत्तर मध्य महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात असलेला कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासात पश्चिम बंगाल व बांग्लादेशची किनारपट्टी पार करणार आहे. त्यानंतरच्या 48 तासात हा पट्टा ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात (डिप्रेशन ) होणार आहे. तर शनिवारी (दि.24) या पट्ट्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या स्थितीमुळेच राज्याच रविवार पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातून 28 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानमधून सुरू झालेला मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला होता. आता मात्र हा प्रवास सुरू झाला असून बुधवारी उत्तर प्रदेश, बिहार (अंतर्गत भाग), पश्चिम बंगाल, सिक्कीम झारखंड, उत्तर छत्तीसगड, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश मार्गे दक्षिणेकडे जाणार आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट:
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, नगर, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे.