# मुंबई पोलिसांचे पगार एचडीएफसी बँकेत; १ कोटीपर्यंत मिळणार विमा कवच.

मुंबई: मुंबई पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. बँकेतून पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ मध्ये अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने २०१५ मध्ये सरकारने पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एचडीएफसी बँक पोलिसांना १० लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे. नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *