# नारी शक्ती: नौदलात महिला वैमानिकांची पहिली तुकडी कार्यरत.

कोची तील आयएनएस गरुडा नौदल तळावर पासिंग आऊट परेड

नवी दिल्‍ली: भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागातर्फे आज कोची येथे डोर्नीयर या लढाऊ विमानावर नौदलातील पहिल्या महिला वैमानिकांची तुकडी कार्यरत करण्यात आली. लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट शुभांगी स्वरूप या तीन महिला वैमानिक 27 व्या डोर्नियर ऑपरेशनल फ्लाईंग ट्रेनिंग (DOFT) या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या सहा वैमानिकांपैकी होत्या.

या वैमानिकांनी मेरीटाईम रिकॉईन्स पायलट म्हणजेच सागरी टेहळणी वैमानिक म्हणून पदवी मिळवत आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि 22 ऑक्टोबर रोजी कोची येथे आयएनएस गरुडा या नौदलतळावर त्यांची पासिंग आऊट परेड देखील पूर्ण झाली.

रिअर ॲडमिरल अँटोंनी जॉर्ज, मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला वैमानिकांचा पुरस्कार देऊन गौरव केला. पहिल्या तुकडीतील वैमानिकांमध्ये लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शिवांगी, आणि लेफ्टनंट शुभांगी स्वरूप या तिघींचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना आधी हवाई दल आणि नौदल या दोन्हीकडून उड्डाण करण्याचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांना  DOFT चे प्रशिक्षण देण्यात आले. या तिघींपैकी लेफ्टनंट शिवांगी यांनी पहिल्यांदा हे प्रशिक्षण पूर्ण केले.

या अभ्यासक्रमात एक महिन्याचे मैदानी प्रशिक्षण, आठ महिन्यांचे उड्डाण प्रशिक्षण, जे SNC, INAS 550 येथे देण्यात आले, त्याचा समावेश होता. लेफ्टनंट दिव्या शर्मा उड्डाणात तर लेफ्टनंट शिवम पांडे मैदानावरच्या प्रशिक्षणात पहिले आले. सर्वाधिक उत्तम प्रशिक्षणार्थीचा फिरता चषक लेफ्टनंट कुमार विक्रम यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *