पूर्णाहुती महापूजेने नवरात्र महोत्सवाची सांगता
अंबाजोगाई: महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळी सात वाजता पूर्णाहुती, होमहवन व महापूजेने योगेश्वरी देवीची महापूजा झाली. तहसीलदार संतोष रूईकर व सौ.कमल संतोष रूईकर यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली.
दरम्यान, रविवारी योगेश्वरी देवीची पालखी विजयादशमीच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी ६ वाजता सिमोल्लंघनासाठी मंदिरालाच फेरी मारणार आहे. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून हा पालखी सोहळा बंद दरवाजाआड होणार असल्याने या वर्षीच्या सिमोल्लंघनासाठी भाविकांना योगेश्वरी देवीच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.
१७ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. शनिवारी सकाळी मंदिरात पूर्णाहुती व होमहवन होऊन महापूजा झाली. तहसीलदार संतोष रूईकर व सौ.कमल संतोष रूईकर यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या महापूजेसाठी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त राजकिशोर मोदी, गिरधारीलाल भराडिया, कमलाकर चौसाळकर, अक्षय मुंदडा, माजी आ.पृथ्वीराज साठे, उल्हास पांडे, प्रा.अशोक लोमटे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, पूजा कुलकर्णी, डॉ.संध्या जाधव, गौरी जोशी, यांच्यासह पुरोहित व मानकरी यांची उपस्थिती होती.