# स्वारातीम विद्यापीठ २०२० परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर.

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नियोजन यशस्वी करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर होणार आहेत. ही माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी दिली.

नवीन तंत्रज्ञान, नवीन परीक्षा पद्धती आणि कमी वेळ या सर्वांची सांगड घालतांना एक दोन दिवसाची तांत्रिक अडचण सोडल्यास बाकी परीक्षेचे नियोजन सुरळीत चालू आहे. इतर विद्यापीठाच्या तुलनेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सरस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उन्हाळी २०२० परीक्षेचे नियोजन करतांना सर्वप्रथम दोन टप्पे आखण्यात आले. पहिल्या टप्प्यात अंतीम सत्राच्या आणि अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे अथवा सत्राचे बॅकलॉग विषयाची परीक्षा ७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. दुसऱ्या टप्यात अंतीम सत्राच्या आणि वर्षाच्या परीक्षा १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले.

नियोजनासाठी सर्वप्रथम परीक्षा मंडळ, विद्याशाखा आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यासोबत बैठकी घेण्यात आल्या. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार उन्हाळी २०२० परीक्षा एमसीक्यू पद्धतीने ऑनलाईन व ऑफलाईन घेण्याचे ठरले.

विद्यार्थांमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात संभ्रमता राहू नये म्हणून त्यांच्या मॉकटेस्ट घेण्यात आल्या यामध्ये नेमकी परीक्षा कशी घ्यावयाची आहे. याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी पद्धती योग्य वाटते त्याची समंतीपत्रक विद्यार्थांकडून भरून घेण्यात आले.

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धत निवडली तर त्यामधील १६७०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. हे सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर को-ओर्डीनेटर द्वारे देण्यात आले.

पूर्व तयारी म्हणून विद्यापीठांच्या संलग्नित सर्व प्राच्यार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा मॉक टेस्टद्वारे पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्या शिवाय ५४८ ऑनलाईन परीक्षेसाठी को-ऑर्डीनेटर ची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देतांना अडचण उद्भवल्यास त्यांच्या मदतीसाठीही टीम तयार ठेवण्यात आली आहे. आणि त्यामुळे त्यांची विद्यार्थ्यांना मदतही झाली. सध्याच्या कोविड-१९ या महामारीला रोखण्यासाठी निर्धारित परीक्षा केंद्रांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. यामध्ये निर्जंतुकीकरण, ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनिंग मशीन, मास्क इत्यादी खरेदीचा समावेश होता. यासाठी महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.

ऑफलाईन परीक्षेदरम्यान कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठीही काळजी घेण्यात आली आहे. या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी ५०,००० विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण २१५३ प्रश्नपत्रीकेद्वारे परीक्षा घेण्यात येत आहेत.

परीक्षा न देवू शकलेल्यांची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेणार:
विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या (NET,SET व CET) इतर परीक्षा आल्या. त्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिवाय पदवी, पदव्युत्तर, व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे जर काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. सध्या परीक्षा सुरळीतपणे चालू असल्यामुळे त्या ३० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन ३१ ऑक्टोबर रोजी या जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल घोषित करेल अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्यासह, प्र कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, अंतरविद्याशाखीय अभ्यास अधिष्ठाता डॉ.वैजयंता एन. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *