# मांजरा धरण ४० वर्षांत केवळ १४ वेळा भरले; धरणावर पर्यटकांची गर्दी.

अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, लातूर शहरासह ४० गावांना दिलासा

अंबाजोगाई: अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त असलेले धनेगांव येथील मांजरा धरण पूर्णत: भरले आहे. परतीच्या पावसाने धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या ४० वर्षात केवळ १४ वेळा मांजरा धरण भरले आहे. धरण भरल्याची सुखद बातमी सर्वत्र झाल्याने धरण पाहण्यासाठी अंबाजोगाई तालुका व परिसरातील नागरीक व पर्यटक धरणावर मोठी गर्दी करू लागले आहेत.

सिंचनासाठी १९८० मध्ये मांजरा धरणाची उभारणी झाली. धरणाची क्षमता २५०.७० द.ल.घ.मी. आहे. मांजरा धरणात केज व उस्मानाबाद परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित करण्यात आल्या व हे धरण अस्तित्वात आले.

मांजरा धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले होते. मात्र, गेल्या वीस वर्षात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, लातूर शहरासह ४० गावच्या पाणीपुरवठा योजना धरणातून सुरू आहेत. हे धरण शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित राहिल्याने धरणातील पाण्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. धरणाची क्षमता मोठी असूनही धरणात येणारा पाण्याचा प्रवाह कमी व लांब पल्ल्याचा असल्याने साध्या पावसात धरण भरणे दुरापास्त होते. गेल्या ४० वर्षात या वर्षासह केवळ १४ वेळेसच मांजरा धरण भरले आहे. जेव्हा धरण भरते त्यावेळेसच शेतकऱ्यांना २ ते ३ टप्प्यात १०० ते १२५ द.ल.घ.मी. पाणी उजव्या व डाव्या कालाव्यातून सिंचनासाठी सोडले जाते. मात्र, धरणच भरत नसल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. या धरणावर ७० गावच्या लोकांनी मोठमोठ्या जलवाहिन्या पाणी खेचण्यासाठी लाखो रुपये खर्च करून टाकल्या. मात्र, त्यांचा हा खर्चही पाण्याअभावी निघणे मुश्कील झाले.

यंदा मुबलक झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात जून महिन्यांपासूनच हळूहळू वाढ होऊ लागली. कोरडे पडत आलेले धरण पूर्णत: भरण्यासाठी ५ महिन्याचा कालावधी लागला. गेल्या पाच वर्षांपासून अंबाजोगाईकर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत होते. त्यांना हे धरण भरल्यामुळे आगामी तीन वर्षांसाठी तरी मोठा दिलासा मिळाला आहे. धरणाची वाढलेली पाणीपातळी पाहण्यासाठी अंबाजोगाई व परिसरातील पर्यटकांची, शहरवासियांची व ग्रामस्थांची धरणावर मोठी गर्दी होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *