# पोहरादेवी संस्थानचे प्रमुख संत डाॅ.रामराव महाराज यांचे निधन.

वाशिम: पोहरादेवी संस्थानचे प्रमुख तथा देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल शुक्रवारी (30 ऑक्टोबर) रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ.रामराव महाराज यांच्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.

संत डॉ.रामरावजी महाराज यांचे लाखो अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यात असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.

आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले: अशोकराव चव्हाण

बंजारा समाजाचे धर्मगुरू, संत, तपस्वी डॉ.रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाज सुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *