तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत डॉक्टरांच्या सेवा नियमित करा यासह इतर मागण्यांचा समावेश
अंबाजोगाई: अस्थायी सहायक प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी सोमवार, 2 नोव्हेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात स्वामी रामनंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना गुरूवार, 29 ऑक्टोबर रोजी निवेदन पाठविले आहे.
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने सहायक प्राध्यापक अस्थायी स्वरुपात कार्यरत आहेत. सध्या कोरोना महामारीत अस्थायी डॉक्टरांनी दिवसरात्र परिश्रम घेतले आहेत. सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी 15 व 16 ऑक्टोबर रोजी काळी फीत लाऊन आंदोलन केले होते. तसेच अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शनेही केली होती. मात्र या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे अस्थायी डॉक्टरांनी सोमवार, 2 नोव्हेंबर पासून सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे, संचालक, अधिष्ठाता तसेच जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन दिलेले आहे. आंदोलन काळात रुग्णसेवेवर होणार्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहिल, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना काळात डॉक्टर संपावर जाण्याने वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयी बोलताना डॉ.अमित लोमटे यांनी सांगितले की, शासनाने सर्व अस्थायी डॉक्टरांचा नियमित सेवेत समावेश करावा. तसेच आम्हाला सातवा वेतन आयोगानुसार वेतन आणि लाभ द्यावेत यावर लवकरात लवकर निर्णय न झाल्यामुळे 2 नोव्हेंबर पासून अस्थायी सहायक प्राध्यापक संपावर जात आहेत.