# अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले.

रायगड: अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णब गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णब गोस्वामी यांनी फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. खारघर येथील तळोजा कारागृहात क्वारंटाईन सेंटरची सुविधा आहे. याठिकाणी अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात आले आहे .

गेल्या काही दिवसांत अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णब यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडून रितसर परवानगी घेऊन अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यासाठी कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले होते. खारघर येथील तळोजा कारागृहात क्वारंटाईन सेंटरची सुविधा आहे. याठिकाणी अर्णब गोस्वामी यांना ठेवले आहे. हा परिसर तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली असल्याने या ठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती अर्णब गोस्वामी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

अलिबागवरून तळोजाच्या दिशेने रवाना होत असताना अर्णब गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलू दिले जात नाही. मला आज सकाळी सहा वाजता उठवण्यात आले. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *