प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे निर्देश
पुणे: दिवाळी सणामध्ये सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी सज्ज राहण्यासोबतच वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. यासोबतच नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन पेडपेडींग असणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित कराव्यात असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वीजयंत्रणा आणि घरगुती विद्युत उपकरणांपासून सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांसोबत नुकतीच व्हीडीओ काॅन्फरन्सिगद्वारे बैठक झाली. यामध्ये दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक (प्र.) श्री.नाळे यांनी दिल्या आहेत.
सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन: महावितरणची विजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे: घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर वातीचे दिवे लावावेत असे आवाहन करण्यात आले आहे.