12 नोव्हेंबरनंतर राज्याच्या सर्वच भागात थंडी वाढणार
पुणे: राज्यातील विदर्भाच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली असून, सोमवारी विदर्भातील चंद्रपूरचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 7.4 अंशांनी कमी आहे. दरम्यान, 12 नोव्हेंबरनंतर राज्याच्या सर्वच भागात थंडी वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट सुरू झाली आहे. मात्र,12 नोव्हेंबरनंतर हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवात पोहचणार आहे. त्यानंतरच ख-या अर्थाने जोरदार थंडी सुरू होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात थंडी वाढली आहे. सर्वसाधारणपणे 0.7 अंशापासून ते अगदी 7.4 अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुढील काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात सोमवारी नोंदलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे: पुणे- 14.6 (-0.7), जळगाव- 13.0 (-2.7), महाबळेश्वर- 15.6 (-1.5), सोलापूर- 17.8 (-0.2), मालेगाव- 12.6 (-1.6), औरंगाबाद-14.4 (-0.6), अकोला- 13.2 (-4.9), अमरावती- 13.3 (-5.1), ब्रम्हपुरी- 14.3 (-2.7), बुलढाणा- 15.0 (-2.8), चंद्रपूर- 10.0 (-7.4), गोंदिया- 12.5 (-5.2), नागपूर- 13.4(-2.7).