# धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर -शरद पवार.

‘आंतरभारती’ दिवाळी अंकाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतासारखा देश एकसंध ठेऊ शकते. त्याच संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये. धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत. हिंदू – मुस्लिम, इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे. कटुतेला शासकीय आधार दिला जात आहे. राज सत्तेचा वापर केला जात आहे. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला पाहिजे. या कामी जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

‘आंतरभारती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या मोदी बाग या निवासस्थानी मंगळवारी सकाळी अनौपचारिकरित्या झाले. तेव्हा ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भाषा, जात, धर्म यात समाज दुभंगता कामा नये. आंतरभारती या दिशेने काम करेल, अशी आशा आहे. या कार्याला मी शुभेच्छा देतो. साने गुरुजींनी एकसंध समाजासाठी योगदान दिले. त्यांचे आंतरभारती चे स्वप्न आपण सर्वांनी साकार केले पाहिजे. आंतरभारतीचे विचार अन्य भाषांमध्ये गेले पाहिजेत. वैचारिक दिशा देणारा हा अंक आहे’

प्रास्ताविक करताना आंतरभारती दिवाळी अंकाचे अतिथी संपादक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, वाचकांचे धर्मनिरपेक्षतेवर उद्बोधन करण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. धर्म चिकित्सा, चिंतन, राजकीय भूमिका, संविधान असा वैचारिक परिप्रेक्ष्य या अंकात घेतला आहे. सहिष्णुतेची संस्कृती जपली पाहिजे. चिकित्साही व्हावी, असा अंकात प्रयत्न केला आहे.

डॉ. विवेक सावंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात आंतरभारती सारख्या संकल्पनांना चांगला वाव आहे. संविधान विषयक संकल्पनांना आंतरभारतीने साने गुरुजींसारख्या सोप्या भाषेत सर्वांपर्यंत न्यावे. यावेळी आंतरभारतीचे डी.एस. कोरे, अंकुश काकडे हे उपस्थित होते.

आंतरभारती अंकाविषयी:
“सेक्युलॅरिसम/सर्वधर्मसमभाव ” या आजच्या भारतासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या विषयाला वाहिलेला “आंतरभारती” चा दिवाळी अंक १० नोव्हेंबर 2020 रोजी प्रकाशित झाला. एकूण सात भाग, तब्बल चाळीस लेख व महाराष्ट्रातील महत्वाचे चाळीस विचारवंत व अभ्यासू लेखक आणि सेक्युलॅरिझमच्या सर्वच पैलूंवर प्रकाश पडेल असे विषय आहेत. लक्ष्मीकांत देशमुख हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. यावेळी आंतरभारतीचे डी.एस. कोरे, अंकुश काकडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *