अंबाजोगाई: येथील ‘मानवलोक’ संस्थेचे कार्यवाह तथा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या मंत्रालयाच्या वतीने ‘जल योद्धा’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील जल संधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. बुधवारी (दि.११) रोजी पार पडलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते अनिकेत लोहिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. द्वारकादासजी लोहिया यांनी चार दशकांपूर्वी ‘मानवलोक’ संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात दुष्काळ निवारणाचे प्रयत्न सुरु केले. जलसंधारणाची कामे करून त्यांनी अनेक गावे दुष्काळमुक्त केली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत अनिकेत लोहिया यांनी मागील आठ वर्षांत भूजल पुनर्भरण आणि पृष्ठभागाची पाण्याची क्षमता सुधारण्यासाठी विशेषतः ‘पाणलोट विकासासाठी’ जल क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. मराठवाड्यातील जलप्रकल्पातील गाळ काढून पाणी साठा कसा वाढेल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाने त्यांची ‘जल योद्धा’ पुरस्कारासाठी निवड केली. बुधवारी ऑनलाईन कार्यक्रमातून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि दीड लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिकेत लोहिया यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.