स्वच्छ व दुर्गंधी मुक्त भारत मोहिमेला होणार मोठी मदत
पुणे: दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) आणि स्वछता विषयी सेवा देणारी आणि उपकरणे तयार करणारी सारा प्लास्ट या देशातील अग्रेसर संस्थेशी सामंजस्य करार नुकताच पार पडला. या करारामुळे देशभरातील दहा हजार नवे दलित उद्योजक निर्माण होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत, डिक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे , सारा प्लास्ट चे संचालक राजीव खेर उपस्थित होते .
सारा प्लास्ट ही स्वछता सारख्या विषयात काम करणारी देशातील पहिलीच संस्था म्हणून ओळखली जाते. ही संस्था गेली 22 वर्ष सॅनिटेशन या क्षेत्रात कार्य करत आहे. देशातल्या 8 राज्यामध्ये या संस्थेचे जाळे विखुरले आहे. स्वछ व हागणदारीमुक्त भारत योजनेला पूरक असे काम ही संस्था करीत आहे. या संस्थेने देशभरात दलित उद्योजकांसाठी कार्यरत असणाऱ्या डिक्की या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता देशात 10 हजार उद्योजक (सॅनि प्रुनर्स) निर्माण होणार आहेत.
डिक्की ने हैदराबाद आणि दिल्ली शहराला अत्याधुनिक उपकरणे दिली. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्टँड अप योजनेतून अर्थसहाय्य डिक्की ने मिळवून दिले. शिवाय महापालिकेची कामे ही मिळवून देण्यात आली. आता आधुनिक पद्धतीने काम केले जात आहे. त्यामुळे या शहरात या क्षेत्रातील सफाई कामगारांचा मृत्यू दर शून्यावर आला आहे.
आता हाच प्रयोग सारा प्लास्ट संस्थेला बरोबर घेऊन देशातील 100 स्मार्ट सिटी, 500 अमृत शहरे, 11 हेरिटेज (ऐतिहासिक) शहरामध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सफाई क्षेत्रात 10 हजार नवे उद्योजक निर्माण करण्याचा संकल्प डिक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला. तसेच भारतात सफाई कामगारांना कमी मोबदला मिळतो तर परदेशात जास्त मिळतो. शिवाय तिकडे या कामगारांना प्रतिष्ठा पण मिळते. मात्र, आपल्याकडे उलटे आहे. त्यामुळे या कामाला आणि व्यवसायाला मोबदला आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले .
या वेळी माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले की, आजचा हा ऐतिहासिक क्षण असून डिक्की आणि सारा प्लास्ट यांच्या करारामुळे देशातील सफाई कामगारांचा मृत्यूदर कमी होईल. व या क्षेत्रातील कामगारांना निरोगी व चांगले जीवन मिळवून देण्यास नक्की मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
परदेशातील उच्चपदस्थ मोठ्या पगाराची नोकरी सोडून या क्षेत्रात काम करणारे सारा प्लास्ट चे कार्यकारी संचालक राजीव खेर म्हणाले की, भारतात मैलापाणी आणि इतर सांडपाण्यामुळे पर्यावरण व आरोग्याचे मोठे आणि प्रमुख प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय आपल्याकडे फक्त 20 टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया होते बाकी सर्व नदी, नाले व इतर ठिकाणी सोडले जाते आणि त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाचे गंभीर स्वरूप वाढत आहे. त्यामुळे मी या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी मी काम करीत आहे. शिवाय आम्ही आता ओला, उबेर सारखे हनी सक्कर अॅप बनविले असून सेफ्टी टँक, ड्रेनेज सफाई , मैलापानी या सेवा तत्काळ देणार आहोत, असे खेर यानी सांगितले.
कार्यक्रमास डिक्की चे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी रवि नारा हैदराबाद, संतोष डांगी दिल्ली, राजा नायक बंगळुरू, संतोष कांबळे मुंबई, सीमा कांबळे, वनझाक्षी नारा, अरुण धन्नेवार, अविनाश जगताप, अनिल होवाले आदी उपस्थित होते.