पुणे: राज्याच्या सर्वच भागात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह हजेरी लावीत आहे. आणखी दोन दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही चार ते पाच अंशापर्यंत वाढ राहणार आहे. वास्तविक पाहता दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतो. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नोव्हेबर मधील थंडी गायब झाली असून, आता थंडीसाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रीय झाला आहे. तर उत्तर भारताकडून राज्याकडे वाहत असलेल्या वा-यांच्या माध्यमातून आर्द्रता येत आहे. त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन ते आता ओमानकडे सरकणार आहे. याबरोबरच हिंदी महासागर ते दक्षिण बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा 23 नोव्हेंबरपर्यंत तयार होणार आहे. या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असून, हा पट्टा श्रीलंका ते तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे पुढील 48 तासात सरकणार आहे. यामुळे ईशान्य मान्सून आणखी सक्रीय होणार आहे. याबरोबरच उत्तर मध्यमहाराष्ट्रावर चक्रीय स्थिती कार्यरत असून, बिहार ते दक्षिणपूर्व मध्यप्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे. या सर्व स्थितीमुळे उत्तर भारतातून थंडी गायब झाली आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे वाहणा-या वा-यामधून आर्द्रता येत आहे, तर दक्षिण भारताकडून देखील वाहणा-या वा-यामधून आर्द्रता वाढली आहे. या मुळेच राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्याच्या बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ या भागात पावसाने हजेरी लावली. तर पुढील 48 तासात अशीच स्थिती राज्यभर राहणार आहे.