राज्यात आज ५ हजार ६४० नवे पॉझिटिव्ह रूग्ण
मुंबई: महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या घरांमध्ये होती. आता सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ५ हजार ६४० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, मागील २४ तासांमध्ये ६ हजार ९४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १६ लाख ४२ हजार ९१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८९ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ७८ हजार २७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ५ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.