शिवसंग्राम व सावा सीड्स यांच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वितरण
बीड: सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत न करता नाकर्तेपणा दाखवला व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र, अशा प्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाईट प्रसंगी सावा सीड्स यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांना फुल नाहीतर फुलाची पाकळी अशा स्वरूपाची मदत जाहीर केली हे खरोखर एका समजदार आणि शेतकऱ्या विषयी तळमळ असणाऱ्या व्यवस्थापनाचं काम आहे, असे प्रतिपादन शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केले.
शिवसंग्राम व सावा सीड्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड तालुक्यातील उमरद जहाँगीर येथे परिसरातील 10 गावांतील जवळपास 800 शेतकऱ्यांना आठ लाख रूपये किमतीची बियाणे मोफत वितरित करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सावा सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष तावरे, सावा सीड्सचे विपणन प्रमुख अरुण मुळे, भारतीय शिवसंग्राम परिषदचे जिल्हा प्रमुख प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, माजी उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके, सर्वोच्च न्यायालयाचे वकील विशाल जोगदंड, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.पंकजा माने, बीड पंचक्रोशीतील विविध गावातील सरपंच व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
आ.मेटे पुढे म्हणाले, की अनेक पुढारी व नेते हे शेतकऱ्यां विषयी भाषणबाजी करतात परंतु एकही नेता व पुढारी खऱ्या अर्थाने मागासलेल्या भागात म्हणजेच विदर्भ आणि मराठवाडा या कोरडवाहू भागात काम करत नाही, अशी खंतही आ.विनायक मेटे यांनी
व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील काही राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून राजकारण केलं आणि साखर सम्राट झाले अशा शब्दात आ.विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यातील साखर सम्राट नेत्यांना टोला लगावला. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणा बरोबरच मी स्वतः यापुढे शिवसंग्राम किसान आघाडी स्थापन करून गरीब आणि अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना एक नवीन संघटना स्थापन करून शेतकऱ्यांचा लढा लढणार असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले, सावा सीड्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष तावरे यांना विनंती केली की खरीप 2020 चा हंगामा मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच त्यांनी बीड जिल्ह्यात सावा सीड्स या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी एखादी बियाणे कंपनी स्थापन करता आली तर आपण पुढाकार घ्यावा आणि अशा नवीन धोरणावर चालणाऱ्या बियाणे कंपनी ची महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात स्थापना करावी, अशी इच्छा व्यक्त केली. अशा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या कुठल्याही संस्थेत शिवसंग्राम संघटना 100% संपूर्णपणे साथ देईल आणि मदत करेन असे आश्वासनही आमदार विनायक मेटे यांनी दिले.
सावा सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष तावरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना, प्रामुख्याने आमची बियाणे कंपनी ही कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी लक्ष देऊन काम करते व आमच्या कंपनीचे संशोधन हे शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर असल्याचे नमूद केले. तसेच शिवसंग्राम किसान आघाडीच्या वतीने आ.विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यातील उमरद जहाँगीर येथे हा कार्यक्रम आयोजित केला याचा मला खूप आनंद होतोय कारण मी स्वतः बीड जिल्ह्यातील आणि उमरद जहाँगीर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निरगुडी या गावचा रहिवासी आहे, आणि मला हा भाग कमी पाणी असल्यामुळे शेतीच्या उत्पादनासाठी कसा होरपळून निघालेला आहे याची पूर्णपणे जाणीव आहे असाही उल्लेख केला. बीड जिल्ह्याचा सुपूत्र म्हणून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करून मला जो आनंद मिळाला तो आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि यापुढेही आमच्या कंपनीच्या वतीने असे विविध कार्यक्रम मी बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात घेऊन शेतकऱ्यांना फूल नाही तर फुलाची पाकळी अशा प्रकारची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असेही डाॅ.संतोष तावरे यांनी सांगितले.
माजी उपजिल्हाधिकारी डाॅ. एन.आर. शेळके यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेती विषयक जोड धंदे सुरू करावेत आणि पुढील काळात जो शेतकरी निसर्गाने दिलेला संदेश जाणून घेऊन आपली शेती करेल किंवा शेतीच्या उत्पादनामध्ये लागवडीच्या तारखे मध्ये बदल करेल असे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतील असे नमूद केले.
अॅड. विशाल जोगदंड यांनी मार्गदर्शन करताना विनायक मेटे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि मेटे साहेबांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून जी शिवसंग्राम किसान आघाडी स्थापन केली आहे त्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि शिवसंग्राम किसान आघाडीच्या एक किसान किंवा शेतकरी यांच्या साठी लागणाऱ्या या संघटनेमध्ये डॉ.संतोष तावरे यांच्यासारखे शेतीतज्ज्ञ व तरुण व्यवसायिक घेऊन पुढेही आपली किसान आघाडी वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभाकर आप्पा कोलांगडे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विशेष करून विनायक मेटे यांनी मागील तीस वर्षांमध्ये विविध प्रकारचे लढे देऊन शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत केली आणि कशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी लढले हे स्पष्ट केले. तसेच मेटे यांच्या यापुढील लढ्यात आपण साहेबांसोबत सतत राहू असे आश्वासन दिले. शिवसंग्राम चे जिल्हाप्रमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील ज्या 10 गावांमध्ये मोफत बियाणे वाटप करण्यात आली त्या सर्व दहा गावचे सरपंच तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या वतीने आ.विनायक मेटे यांचा सत्कार केला.