उद्घाटन शेषराव मोहिते, समारोप अमर हबीब करणार
अंबाजोगाई: मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबीर 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत होत असून त्यात सुमारे दीडशे शिबिरार्थी भाग घेत आहेत. नांदेड व बीड जिल्ह्यातील शिबिरार्थींची संख्या सर्वाधिक आहे. दररोज रात्री 8 ते रात्री 8.30 या वेळेत शिबीर चालेल. शेतकरीविरोधी कायदे या विषयावर होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ.शेषराव मोहिते (लातूर) करणार असून अमर हबीब (अंबाजोगाई) यांच्या व्याख्यानाने समारोप केला होणार आहे.
शिबिरात अनेक मान्यवर बोलणार आहेत. डॉ. विकास सुकाळे, नांदेड (सिलिंग कायदा), सुभाष कच्छवे, परभणी (आवश्यक वस्तू कायदा), ऍड संध्या भूषण पाटील, औरंगाबाद (जमीन अधिग्रहण कायदा), अमृत महाजन, अंबाजोगाई (शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या), प्रा. डॉ.शैलजा बरुरे अंबाजोगाई (सर्जकांचे स्वातंत्र्य) यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होतील. त्यावर शिबिरार्थी चर्चा करू शकतील. वरील व्याख्यात्यांशिवाय प्रा.सुधाकर गोसावी (अंबाजोगाई), अंकुश खानसोळे (नांदेड), एकनाथ कदम (परतूर, जालना), नरसिंग देशमुख (देगलूर, नांदेड), डॉ.उद्धव घोडके (गेवराई, बीड), इंजि. प्रशांत शिनगारे (बीड-पुणे), असलम सय्यद (अंबाजोगाई-पुणे) व अन्य किसानपुत्र मनोगत व्यक्त करणार आहेत.
किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावे यासाठीची चळवळ आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली शेतकरी स्वातंत्र्याची चळवळ आहे. शेतकरीविरोधी कायदे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना समजावेत म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक नितीन राठोड यांनी दिली आहे.