दिएगो मॅराडोना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्समध्ये झाला होता. अत्यंत गरीब परिस्थितीत बालपण गेलेल्या मॅराडोना यांना फुटबॉलचा ध्यास होता. मॅराडोना यांच कौशल्य अर्जेंटिनाच्या ज्युनियर टीमच्या कोचच्या लक्षात आलं. त्यातूनच मॅराडोना यांनी अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघासाठी खेळायला सुरुवात केली होती.
अफलातून पदलालित्य आणि गोल करण्यातलं अद्भुत कौशल्य यामुळे मॅराडोना यांचं नाव दिग्गज फुटबॉलपटूंच्या मांदियाळीत घेतलं जातं. ५फूट ५ इंच उंचीमुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्याने मॅराडोना यांचं बॉलवर नियंत्रण मिळवून प्रतिस्पर्ध्यांच्या तावडीतून निसटून गोल करणं यामध्ये मॅराडोना यांची खासियत होती. दिएगो मॅराडोना यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं. मॅराडोना यांनी कारकीर्दीत ४९१ मॅचमध्ये २५९गोल केले. विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू असं त्यांचं वर्णन करण्यात येत असे.१९८६ च्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातली मॅच मॅराडोना यांच्या गोलमुळे संस्मरणीय ठरली.
१९८६चा फुटबॉल वर्ल्ड कप मेक्सिको देशात झाला. इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन्ही टीम स्पर्धेपूर्वी विजेतेपदाच्या दावेदार नव्हत्या. पण, स्पर्धेच्या साखळी फेरीत मात्र दोघांनी दणदणीत कामगिरी केली होती. अर्जेंटिनासाठी दिएगो मॅराडोनाचा काळ नुकता सुरू झाला होता. इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टन सर्वांत अभेद्य बचावासाठी प्रसिद्ध होता. इंग्लंड आणि अर्जेंटिनाच्या टीम क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी मेक्सिको सिटी शहरात आमने सामने आल्या. १९६६च्या वर्ल्ड कपपासून दोन टीममधून विस्तवही जात नव्हता. टीमचे पाठीराखेही आपला राग स्टेडिअमबाहेर मुक्तपणे व्यक्त करत. तर इंग्लिश समालोचक अर्जेंटिना टीमचा नामोल्लेख टाळून ‘द अदर टीम’ किंवा ‘प्लेअर फ्रॉम अदर टीम’ असं म्हणायचे. अशा वेळी २२ जून १९८६ जूनच्या दुपारी ही मॅच सुरू झाली. अपेक्षेप्रमाणेच मुकाबला मॅराडोना आणि इंग्लिश गोली पीटर शिल्टन यांच्यामध्ये होता. पहिल्या हाफमध्ये मॅराडोनाचे काही सुरेख पास शिल्टन यांनी अडवले. पण दुसऱ्या हाफमध्ये दहाव्याच मिनिटाला तो क्षण आला. मॅराडोना यांनी मैदानाच्या डाव्या बगलेतून बॉल पुढे खेळायला सुरुवात केली. म्हणता म्हणता त्यांचा हल्ला तीव्र झाला. आणि डाव्या बाजूनेच भन्नाट वेगाने पुढे सरकत त्यांनी बॉल गोलजाळ्याच्या दिशेनं लाथाडला. हा पहिला फटका इंग्लिश मिडफिल्डर स्टिव्ह हॉज यांनी अडवला. पण बॉल त्यांना लागून उडाला. गोलकीपर शिल्टनही हा बॉल घेण्यासाठी गोलजाळं सोडून पुढे धावले. खरंतर शिल्टन ६ फूट उंचीचे. तर मॅराडोना त्यांच्यापेक्षा आठ इंचाने कमी. पण चपळ हालचालींनी मॅराडोना आधी बॉलजवळ पोहोचले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बॉल गोलजाळ्यात ढकलला. असं करताना त्यांचा हात हवेत होता. आणि बॉल खांद्याच्या दिशेनं उंच उडालेलाही सगळ्यांनी पाहिला. पण, सगळं इतकं क्षणार्धात घडलं की रेफरींना हे दिसलं नाही. आणि त्यांनी हा गोल घोषित केला. यूट्यूब या सोशल मीडिया साईटवर या मॅचची क्षणचित्रं उपलब्ध आहेत. पीटर शिल्टन आणि इतर इंग्लिश खेळाडूंनी अर्थातच विरोध केला. पण तेव्हा आतासारखे थर्ड अंपायर नव्हते. त्यामुळे गोल अर्जेंटिनाच्या नावावर लागलाच. अर्जेंटिनानं मॅच २-१ अशी जिंकली. हँड ऑफ गॉड नंतर चारच मिनिटात फुटबॉल जगताला २०व्या शतकातला सर्वोत्तम फुटबॉल गोल बघायला मिळाला आणि तो करणाराही दुसरा तिसरा कुणी नाही तर मॅराडोना होता.
अर्जेंटिनाच्या हाफमध्ये मिडफिल्डर हेक्टर एन्रिक यांनी मॅराडोनाकडे पास दिला. तिथून त्यांनी जी सुरुवात केली ते म्हणता म्हणता ते इंग्लंडच्या गोलजाळ्यापाशी थडकले. असं करताना त्यांनी सात इंग्लिश खेळाडूंना चकवलं आणि शेवटी गोली पीटर शिल्टनला चकवत काम फत्ते केलं. गोल ऑफ द सेंच्युरी जेव्हा मॅराडोनाने 7 इंग्लिश खेळाडूंना चकवत गोल केला. हा गोल २००२मध्ये फिफाने घेतलेल्या जनता पोलमध्ये शतकातला सर्वोत्तम गोल ठरला. या गोलबद्दल मॅराडोना म्हणतात, “मी खरंतर वल्डानोकडे पास देण्यासाठी चाल रचली होती पण, इंग्लिश खेळाडूंनी मला चारही बाजूंनी घेरलं. मला दुसरा पर्यायच उरला नाही. गोल मीच पूर्ण केला.” त्याचवेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्याला पाय मध्ये घालून खाली पाडलं नाही या त्यांच्या खिलाडूवृत्तीसाठी त्यांनी आभारही मानले. मॅराडोना यांनी केलेला गोल त्यांच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये गेला. फुटबॉलमध्ये बॉल हाताला लागणं नियमबाह्य मानलं जातं. परंतु रेफरींनी हा गोल अर्जेंटिनाला बहाल केला. या गोलमध्ये माझं डोकं आणि थोडा दैवाचा हात आहे असं मॅराडोना यांनी म्हटलं. हा गोल फुटबॉलविश्वात ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान, २२ऑगस्ट २००५ रोजी हा गोल मुद्दामहून हाताने गोलपोस्टमध्ये ढकलल्याचा खुलासा मॅराडोना यांनी केला होता. फुटबॉल विश्वातल्या नामुष्कीकारक घटनांमध्ये या प्रसंगाची नोंद झाली. या गोलनंतर चार मिनिटात मॅराडोनाने आणखी एक गोल केला. त्याला फिफाने गोल ऑफ द सेंच्युरी किताबाने गौरवलं. मॅराडोना बार्सिलोना आणि नेपोली या क्लबसाठी खेळले. मॅराडोना अविभाज्य घटक असलेल्या नेपोली क्लबने सीरी ए स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. सध्या जिम्नेशियाया इस्ग्रिमा या अर्जेंटिनातल्या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.
अर्जेंटिनाचे मिडफिल्डर म्हणून जगभरात नावलौकिक कमावलेल्या मॅराडोना यांना कार्डिअक अरेस्टचा त्रास झाला. नोव्हेंबर महिन्यात मॅराडोना यांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आल्या होत्या. मद्यसेवनाची सवय सुटावी यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा मृत्यू २५ नोव्हेंबर २०२० मध्ये झाला. अशा महान फुटबॉलपटू खेळाडू ला विनम्र श्रद्धांजली..
-विकास परसराम मेश्राम
मु.पो. झरपडा, ता.अर्जुनी मोरगाव
जि. गोंदिया
मोबाईल: ७८७५५९२८००