पुणे: टपाल खात्याने नागरिकांच्या सुविधेसाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) येत्या मंगळवारपासून (एक डिसेंबर) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेश टपाल विभागाच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुण्यासह अन्य चार जिल्ह्यांमध्येही पासपोर्ट काढून घेणे नागरिकांसाठी सोईस्कर होणार आहे.
लॉकडाऊनमुळे टपाल खात्याची पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती. पासपोर्ट कार्यालयामार्फत लॉकडाऊननंतर पुण्यातील मुंढवा आणि सोलापूर (शहर) या दोन ठिकाणी असलेली पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) सुरू करण्यात आली. परंतु पोस्टामार्फत सेवा देण्यात येणाऱ्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) केंव्हा सुरू होणार यासंबंधीची प्रतीक्षा नागरिकांना लागली होती. जेंव्हा पोस्ट ऑफिस पीओपीएसके सुरू करण्यास परवागनी देईल. त्यानंतरच पासपोर्टच्या अपॉइंटमेंट घेण्यात येऊ शकतील, असे यापूर्वीच पुणे विभागाच्या पासपोर्ट कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात मुंढवा आणि सोलापूर या ठिकाणच्या केंद्रातून पासपोर्ट साठी दैनंदिन अपॉइंटमेंट्स् देण्यास सुरवात झाली. आता पीओपीएसके सुरू झाल्याने पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतील नागरिकांना देखील पासपोर्ट काढून घेणे सोईचे होईल.
यासंदर्भात पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल कार्यालय येथील वरिष्ठ अधिकारी के.मनोज म्हणाले की, मुंबई येथील कार्यालयामार्फत पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आदेशही पाठविण्यात आले आहेत. पुणे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये आठ पीओपीएसके आहेत. मंगळवार, १ डिसेंबर पासून या ठिकाणची पीओपीएसके सुरू होतील. मात्र, त्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझेशन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी नियमांचे पालन नागरिकांना करावे लागेल.