पुणेः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन होत असलेल्या कोविशिल्ड या कोरोना विषाणू संसर्गावरील लसीचे पहिल्यांदा भारतातच वितरण होणार आहे. ही लस सर्वसामान्यांना परवडेल अशीच असेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ही लस जुलै २०२१ पर्यंत येणार असल्याचे सूतोवाचही पूनावाला यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि कोरोनावरील कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या भेटीत प्रधानमंत्र्यांसोबत कोविशिल्ड लसीबाबत सखोल चर्चा झाल्याची माहितीही पूनावाला यांनी दिली.
सध्या कोविशिल्ड लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर आमचे लक्ष आहे. लसीच्या साठवणुकीची आपल्याकडे पुरेशी आणि सक्षम व्यवस्था आहे. ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही तयारी करत आहोत. कोविशिल्ड लसीचे किती डोस लागणार हे केंद्र सरकारने अद्याप आम्हाला लेखी कळवले नसले तरी सीरमने जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी लसीचे डोस उत्पादन करण्याची तयारी सुरु केली आहे, असेही पूनावाला म्हणाले.
कोविशिल्ड लसीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आम्ही पुढील दोन आठवड्यांत अर्ज करणार आहोत. याबाबत आज पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली आहे. लसीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय निर्णय घेईल. एकदा त्यावर शिक्कामोर्तब झाले की पहिल्यांदा या लसीचे वितरण भारतातच करण्यात येईल. कोविशिल्ड ही लस कोरोनावरील सर्वात प्रभावी लस असल्याचा दावाही यावेळी पूनावाला यांनी केला आहे.