गेल्या ३६ वर्षांपासून अविरतपणे संपन्न होणारा स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह म्हणजे फक्त अंबाजोगाईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी संगीत, साहित्य, कृषी व कला अशा विविध क्षेत्रासाठी एक मानबिंदू ठरला आहे. रसिक जणूकांही या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी झालेल्या दोन दिवसीय स्मृती समारोहामध्ये समारोपाच्या निमित्ताने झालेल्या सांगितिक मैफिलीमध्ये रसिकांनी नाट्यसंगीत आणि जसरंगी जुगलबंदीचा रसास्वाद घेतला. मैफिलीच्या सुरुवातीला गेल्या ६० वर्षांपासून संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अविट गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सौ.राणी वडगावकर आणि आत्ताच्या सौ.सरोजनी देशपांडे यांचे गायन झाले. मैफिलीच्या प्रारंभी मारुबिहाग रागातील छोटा ख्याल “आयो रे सजनिया मन भावना” या बंदिशीने सुरुवात केली. पहाडी आवाज आणि धीर गंभीर आलाप यामुळे रसिकांवर पकड घ्यायला वेळ लागला नाही. स्थाई आणि अंतऱ्यामधील त्यांची विविध प्रकारची लयकारी अप्रतिमच. मारू बिहाग रागातील बंदिश नंतर त्यांनी झपतालातील “प्रेम सेवा शरण” या नाट्यगीताला सुरुवात केली. त्यांच्या गायनामध्ये नाट्यगीताला आवश्यक असणारा वेगळा बाज असल्यामुळे रसिकांना थेट बालगंधर्व आणि शिलेदार कंपनीच्या संगीत नाटकांचा काळ न आठवला तरच नवल! या नाट्यगीतानंतर त्यांनी “दे हाता शरणांगता” या नाट्यगीताने आपल्या मैफिलीचा समारोप केला. स्वरांवरती आजही या वयात असणारी मजबूत पकड थक्क करणारी होती. या नाट्यगीतामध्ये त्यांनी चक्क कर्नाटकी शैलीचा वापर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. युवा पिढीने आदर्श घ्यावा असा सर्वगुण संपन्न गायन रसिकांसाठी पर्वणीच होती. त्यांना संवादिनीवर साथ पांडुरंग देशपांडे यांनी केली तर तबला साथ प्रकाश बोरगावकर यांनी केली.
या गायननंतर “जस के रंग में रंगी हुई जुगलबंदी “अर्थातच “जसरंगी “जुगलबंदी. स्व.पं.जसराजजींच्या तालमीत तयार झालेले श्री.कृष्णा बोंगाणे व अंकिता जोशी या नव्या पिढीच्या कलावंतांनी मुर्छना या गायकीतील अवघड प्रकारात स्वतःचे अविट रंग भरुन सर्वसामान्य रसिकांसाठी एक नवीन आयाम रचला आहे. नारदमुनी तसेच भरताच्या शास्त्रामध्येही मुर्छना पद्धतीचा सविस्तर उल्लेख अढळतो. म्हणजे शेकडो वर्षांपासून गायकीमध्ये अंतर्भूत असणारा हा प्रकार काही परकीय आक्रमणामुळे दुर्लक्षीत राहिला आणि अनेक गायकांनी आपल्या गाण्यामध्ये रंग भरण्यासाठी जेवनात जसं लोणच्यांचा चवीपुरता उपयोग होतो तसाच काहीसा प्रकार मुर्च्छना पद्धतीच्या बाबतीत घडला. पण कृष्णा आणि अंकिता या नव्या पिढीच्या युवा कलावंतांनी याच अवघड प्रकाराला आपलसं करुन रसिकांसाठी एक नवीन पर्वणी उपलब्ध करुन दिली. ज्या रागांमध्ये षड्ज् व मध्यम असा संवाद आहे अशा रागांची निवड करुन जसरंगीची बैठक पक्की केली. कलावती- अभोगी, चंद्रकंस- मधुकंस या व अशा कांही रागांमध्ये मुर्च्छना भेद उत्तम पद्धतीने सादर करता येतो. अनेक गायक असा प्रयोग करतातही. पण स्त्री आणि पुरुष गायक गायिकेची जुगलबंदी शक्यतो रसिकांनी क्वचितच ऐकली असेल , आणि तेही स्त्री गायकाचा षड्ज् पुरुष गायकांसाठी पंचम मानुन व स्त्री गायकाचा मध्यम पुरुष गायकासाठी षड्ज् मानून गाणे अम्मळ अवघडच. एकाच व्यासपीठावर हा प्रयोग करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. कृष्णा आणि अंकिता या जोडीने हे शिवधनुष्य लिलया पेलली. एकाच वेळी ष्डज् व पंचमला मुळ स्वर मानुन वेगवेगळ्या दोन रागांमध्ये प्रत्यक्षात जुगलबंदी यानिमित्ताने रसिकांना अनुभवता आली.
जसरंगीच्या प्रारंभी कृष्णा यांनी पुरिया धनश्री व अंकिता यांनी शुद्ध धैवतचा अंतर्भाव असणारा ललत राग निवडला.”माईरी श्याम श्याम श्याम, श्याम रटत श्यामा श्याम भई” ही बंदीश एकाच वेळी दोन रागात रसिकांना ऐकायला मिळण म्हणजे साक्षात स्वर्गीय सुखच. श्याम श्याम असा टाहो फोडत वृंदावनात फिरणारी श्यामा कधी श्यामरुप झाली हे तिलाच समजले नाही. अगदी तशीच रसिकांची अवस्था झाली होती. भिन्न राग, दोन वेगळ्या स्वरांचे तबले, दोन हार्मोनियम, दोन स्वतंत्र मुळ स्वर आणि तरीही रसिक कलावंत काही क्षणात एकरुप झाल्याचे चित्र मैफिलीमध्ये पहायला मिळत होते. कृष्णाची स्वरांवरील मजबूत पकड आणि अंकिताच्या आवाजातील स्वरमाधुर्य रसिकांना आनंदाचे डोही आनंद तरंग याची अनुभूती देत होते. लयीसोबत खेळणारा स्वर, बोल, आलाप, तयारीच्या स्पष्ट ताना, स्वच्छ शब्दोच्चार आणि स्त्री पुरुष गायकाच्या सुसंवादात तबला आणि संवादिनीला दिलेल्या योग्य त्या जागा त्यामुळे माईरी श्याम ही बंदीश रसिकांना अत्योच्च शिखरावर घेऊन गेली. या बंदिशीनंतर राग जोग आणि वृदावणीसारंग या रागामध्ये स्वतः कृष्णा बोंगाणे यांनी स्वरबद्ध केलेले ‘ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’ हे भक्तीगीत सादर केले. कार्तिकी एकादशी आणि त्यात विठ्ठलाची आर्त विनवणी. यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. एकाच भक्तीगीतामध्ये वृंदावणी सारंगच्या छटा आणि जोग रागातील असलेले वेगळेपण सादर करताना कृष्णा आणि अंकिता यांनी अगदी मुक्तकंठांनी स्वरांची उधळण केली. आपण स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील मैफिलीत नसून चंद्रभागेच्या तीरावर विठुरायाचा गजर करत साकडे घालतोय की काय असा प्रत्येक रसिकांच्या चेहऱ्यावर भाव निर्माण झाला होता. या भक्तीगीतानंतर स्व.जसराजजींना अत्यंत प्रिय असणारी रचना “गोविंद दामोदर माधवेती” या भजनाने मैफिलीची सांगता झाली. राग – नटभैरव आणि मधुवंती या दोन रागामध्ये मुर्च्छना भेद पद्धतीने ही रचना ऐकताना रसिकांचे कान तृप्त होत होते. पाश्चात्य संगीतामध्ये आपण हार्मनी हा प्रकार नेहमी ऐकतो पण शास्त्रीय संगीतामध्ये पूर्णवेळ मैफल हार्मनी (मुर्च्छना भेद) पद्धतीने होऊ शकते हे या समारोहाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता आले आणि आपलं अभिजात शास्त्रीय संगीत जगामध्ये किती समृद्ध आहे याचीही प्रचिती आली. या जसरंगी जुगलबंदीसाठी तबला साथ आशय कुलकर्णी व सागर पटोकार यांनी केली. संवादिनीवर अभिनय रवंदे व अभिषेक शिनकर यांनी अत्यंत जादुई पद्धतीने स्वरांचे रंग भरले. अनेकवेळा संवादिनीच्या तिहाईंनी रसिकांची दाद मिळवली. भक्तीगीतासाठी मंजिरीची साथ धनंजय कंधारकर व दिनेश सन्यासी यांनी केली. स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील या मैफिलीनंतर अखेरच्या रचनेचे स्वर कानात , हृदयात साठवून आपापल्या घरी परतायचा पायंडा असतानाही केवळ रसिकांच्या आग्रहास्तव युवा गायक कृष्णा बोंगाणे व अंकिता जोशी यांचे समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी कौतुक करुन आभार मानले आणि मैफिलीचा समारोप झाला. सुरुवातीला सर्व कलावंताचे स्वागत दगडू लोमटे यांनी केले. ही मैफिल पं.जसराज यांना अर्पण केली होती.
-प्रकाश बोरगावकर, अंबाजोगाई