औरंगाबाद: कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च २०२० पासून खंडपीठाचे सुनावणीचे कामकाज फौजदारी अपील वगळता ऑनलाईन पध्दतीने चालू होते. आता हे कामकाज कोविड १९ बाबतच्या विविध सूचनांचे पालन करुन व्यक्तीशः सुनावणीचे कामकाज १ डिसेंबर २०२० पासून ते १० जानेवारी २०२१ पर्यंत नाताळाच्या सुट्टीचा कालावधी वगळता प्रायोगीक तत्वावर व्यक्तीशः सुनावणी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालय प्रशासनाने घेतला आहे.
व्यक्तीशः सुनावणीचे कामकाज प्रायेागीक तत्वावर १ डिसेंबर पासून सुरु होत आहे. कामकाजादरम्यन खंडपीठात चार डिव्हीजन बेंच व चार सिंगल बेंच सुनावणीचे कामकाजाकरिता बसणार असून, हे कामकाज दोन सत्रात म्हणजे १०.३० ते १.३० व २.३० ते ४.३० दरम्यान होईल. सुनावणी दरम्यान तसेच खंडपीठ इमारतीत कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता विविध सूचना व निर्बंध जारी केलेले आहेत. एसओपी नुसार दिवसात प्रत्येक बेंचला ५० प्रकरणांचा बोर्ड तयार करण्यात येईल. न्याय दालनात सामाजीक अंतराचे काटेकोरपणे पालन करणे अनिर्वाय असेल. खंडपीठात प्रकरणात संबंधित पक्षकाराचे वकील ज्यांची केस बोर्डावर आहे, त्यानांच प्रवेश देण्यात येईल. त्यांचे सोबत त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ लावले असल्यास, त्यांना प्रवेश देण्यात येईल. वकीलांचे नोंदणीकृत कारकून मोठ्या फाईल हाताळण्याकरिता त्यांना प्रवेश देण्यात येईल. जे पक्षकार स्वतः केस चालवतात अशा पक्षकारांना प्रवेश देण्यात येईल. न्याय दालनात जे प्रकरण पुकारले अशाच वकील अथवा व्यक्तीशः प्रकरण चालविणा-या पक्षकारास प्रवेश देण्यात येईल व प्रतिक्षेतील वकील अथवा इतर पक्षकार न्याय दालनासमोर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रतीक्षा करु शकतील.
वकील वर्गास तसेच पक्षकारांना गरज असतांनाच न्यायालयात हजर राहण्यास सूचित केले आहे. न्यायालयात तसेच न्याय दालनात प्रवेश करतेवेळी मास्क लावणे, सामाजीक अंतर ठेवणे ई. आवश्यक असेल. तसेच कोविड १९ बाबत केंद्र तसेच राज्य शासनाने लावलेल्या निर्बंध तसेच निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. न्यायालयात प्रवेश करणे, बाहेर निघणे, प्रकरणे दाखल करण्याकरिता वेगवेगळया सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन वकील संघाकडून वकील सभासदांना तसेच पक्षकारांना करण्यात आले आहे.