पुणे: पाणी आणि शेती हे ग्रामविकासाचे मूळ आहे. केवळ ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा धोरण काम करणार नाही. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन हवे. पाण्याचे नियोजन आणि ग्रामविकासाबाबत एक समान धोरण असेल तरच गाव स्वयंपूर्ण होईल, आणि त्यातून समृध्द हिंदुस्थान बनू शकेल असे मत हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे कोरोनानंतर ग्रामविकासा समोरील संधी आणि आव्हाने या विषयावर आयोजित वार्तालापमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले, कोरोनामुळे अनेकजण गावामध्ये आले, परंतु यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. गावातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल तयार केले पाहिजे. हे मॉडेल सर्वपक्षांनी किमान समान कार्यक्रम म्हणून राबविले पाहिजे तरच गावे स्वयंपूर्ण होऊ शकतील. गावामध्ये रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे, ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर आहे अशा कुटुंबाना इतर व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. कोरोनाला केवळ संकट म्हणून न पाहता त्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, असेही पोपटराव पवार यांनी यावेळी सांगितले.