# ‘विराम’ आणि नवे शोध.

कोरोनासारख्या कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर एक विवेकनिष्ठ माणूस आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लॉकडाऊनच्या काळात काही लेख लिहिले होते. त्याचं ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नुकतेच वाचकांच्या हाती दिले असून एका आठवड्यात त्याची दुसरी आवृत्ती आली आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील एक प्रकरण खास आपल्यासाठी…

आजूबाजूच्या वातावरणातली गती, रोज गाठायच्या ‘टारगेटस’ची भीती आणि टॉपगीयर मधली कृती . . . ह्या गोष्टी आपल्या दिनक्रमाला ‘शिस्त’ लावत असतात. त्यांचा अचानक अभाव म्हणजे गोंधळच की . . . आता नव्याने चौकट उभी करायची. माझ्या घरात व्यक्ती चार. आम्ही तिघे – पती, पत्नी, मुलगा. आणि आमची आत्याआजी. घरात कामाला येणार्‍या दोघी जणी आता येणार नाहीत हे पक्कं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाला येणारी चाची सुद्धा नाही . . . चला, पाकक्रियेचे प्रयोग करायची संधी.

मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असताना मला, वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड लागली. त्यावेळच्या माझ्या पहिल्या मार्गदर्शक होत्या डॉ. शरदिनी डहाणूकर. माझ्या आवडत्या मॅडम. त्यांच्यामुळे माझ्या खोलीत, काळी मिरी, लवंग, तमालपत्र अशा मसाल्याच्या पदार्थांचाही शिरकाव झाला होता. त्यानंतर ही आवड टिकली पण वेळेअभावी फारशी प्रत्यक्षात नाही येऊ शकली. तरी आमच्या घरात, ‘दडपे पोहे’ मीच करणार असे नियम ठरलेले. तर आता कामाला लागलो . . . कॉर्न आणि मशरूमसचे Sautte केलं, ओले खोबरे कोथिंबीर घालून. एकदा ‘पनीर बादाम मसाला’ तर एकदा ‘पालक पीज पनीर.’ शेवयांची खीर बनवली . . . पूर्वी सगळे निवडणे, धुणे, चिरणे करायला मदत मिळायची. आता ती मर्यादित होती. दुसरे म्हणजे आमच्या घरात ‘झीरो सिंक पॉलिसी’ म्हणजे भांडी साठू द्यायची नाहीत. त्यामुळे अथपासून इतिपर्यंत सारे करण्याचा मोका मिळाला.

एक गंमत सांगतो, खीर करताना मी एका बाजूला थोडे दूध आटत ठेवले होते. शेवया शिजवण्यासाठी मुख्य भांड्यात घातले ते वेगळे. जेव्हा खीर तयार होते तेव्हा हे आटीव दूध त्यात घालायचे. . . खायला मजा आली . . . आटवलेल्या दुधाच्या भांड्याला साफ करायला जास्त कठीण जातं हे नव्याने कळलं. दूधाची भांडी धुताना त्यातला ‘ओशटपणा’ राहू नये ह्यासाठीचे तंत्र कळायला लागलं . . . भांडी घासताना आठवले गांधीजी. (कुठे कुठे एंट्री घ्यावी आपल्या आयुष्यात ह्या बाबांनी?) एकदा साबरमती आश्रमात दोन मुलं भांडी घासत होती. गांधीजी लक्षपूर्वक पहात होते त्यांच्याकडे . . . मग त्यांना म्हणाले “मी दाखवतो तुम्हाला कमी पाण्यामध्ये भांडी कशी स्वच्छ करायची ते !” आणि त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखवले त्या मुलांना . . . गांधीजी समजा मुन्नाभाईला दिसले तसे उभे असते शेजारी तर त्यांनी काय सांगितलं असतं?

. . . . नळाची धार कमीच ठेव.

. . . . जरूर तेव्हाच सुरू कर.

. . . . विसळलेले पाणी, विसळणाला वापर.

. . . . भांडी धुताना प्रत्येक भांडे बारकाईने हाताळ.

. . . . तुझी बोटे, सेन्सीटिव्ह बनव.

. . . . मनाप्रमाणे साफ झालं की समाधानाने लाव ते भांडे निथळण्यासाठी !

असं बरंच बोलले बापू, आणि मी वागायला लागलो त्यांनी सांगितल्यासारखे . . . आता मला मजा यायला लागली आहे स्वच्छ सिंक पहाताना . . . करोनोत्तर काळात ही सवय टिकवण्याचे प्रयत्न करायला हवेत अशी माझी इच्छा आणि बायकोचा नवस असणार. असो.

लादी पुसणे हे काम मी फार केल्याचे आठवत नाही. पण ते करताना अनेक बारकावे लक्षात आले. माझ्या हातात लांब दांडावाले पुसणे होते. त्यात योग्य तितकेच पाणी ठेवायचं कसं हे कळायला वेळ लागला. सांदीकपारीमध्ये जाऊन साफ करणे महत्त्वाचे. आणि जर आधीचा कचरा नीट काढला गेला नसेल तर लादी पुसणे अत्यंत उपद्रवकारक होतं हा साक्षात्कार झाला. म्हणूनच बहुदा, झाडणार्‍या माणसानेच पोचा मारावा हे ठरले असणार . . . तात्पर्य, माझे झाडू मारणे अधिक ‘प्रगल्भ’ झाले.

बापू होतेच शेजारी. म्हणाले.

. . . . स्वतःच्या बौद्धिक श्रमांची ऐट दाखवू नकोस.

. . . . बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी, हाताच्या ठिकाणी हात

. . . . दोघांना एकजीव करत करायची कृती.

. . . . कधी बुद्धीचा प्रभाव जास्त, कधी हातांचे प्रमाण जास्त.

. . . . सर्व कृतींना सारखेच महत्त्व दे.

. . . . मनाला जमिनीवर ठेवायचा दुसरा उत्तम उपाय नाही.

आपण कसे एखादा भारी टीव्ही इंटरव्ह्यू दिला आहे म्हणून स्तुतीपर प्रतिसादांमध्ये हवेत तरंगायला लागलेलो असतो . . . त्यानंतर भांडी घासावी, कपड्याच्या घड्या कराव्या, अंथरूण घालायला मदत करावी . . . सर्व वर्तने एकाच प्रतिष्ठेची असतात.

माझ्या घरामध्ये एक नियम आहे. माझ्या वडलांपासूनचा. घरातला संडास घरच्या माणसांनीच साफ करायचा. घरी काम करायला येणाऱ्या कुणालाही हे काम सांगायचं नाही. हे कसं अंगवळणी पडलं ठाऊक नाही . . . पण आज अचानक त्याच्यामधले तत्व लक्षात आले.

माझा मुलगा त्याच्या, प्राणीशास्त्राच्या अभ्यासातल्या पहिल्या इंटर्नशिपसाठी जेव्हा घराबाहेर राहिला तेव्हापासून तो त्याचे ताट, कप, ग्लास स्वतः धुवायला लागला. सध्या मी तसेच करतोय . . . विरामाच्या ह्या पर्वानंतर मला निदान इतकं टिकवता यायला हवं . .

माझी भांडी घासून संपली.

बापूंनी हलकेच खांद्यावर थोपटलं

आणि ते अदृश्य झाले.

***
मी आणि सविता रात्री गप्पा करत होतो. अचानकपणे गप्पांना वेळ ‘मिळायला’ लागला आहे. हेडलाइन्सच्या पलीकडे सतत टिव्ही बघायचा नाही हे आम्ही पाळतोय. तर आमचा विषय निघाला . . . आपल्या भोवतालची, विविध वयोगटातली जोडपी . . . Couples आणि आपल्याला दिसणारी त्यांची नाती. खरं तर Gossip साठी याहून उत्तम विषयच नाही. पण आम्ही असं ठरवलं की जी नाती Well Adjusted दिसताहेत त्यातून आपल्याला काही ‘डिझाईन्स’ काही ‘पॅटर्नस’ सामोरे येताहेत का?

काही नाती अशी असतात ज्यामध्ये एक पार्टनर, भावनिक दृष्टीने, बऱ्यापैकी परिपक्व आणि स्टेबल . . . तर दुसऱ्या पार्टनरच्या भावनिकतेला खूप हेलकावे. ज्याने संसाराची होडी भावनेचे सुकाणू घट्ट धरून पुढे नेली त्या प्रवासात दुसऱ्याची / दुसरीची भावनिक शीडेही फाटण्याआधीच योग्य दिशेचा वारा खाऊन मार्गाला लागली . . . काही नाती अशी सापडली ज्यामध्ये दोघांचेही स्वभाव खूपच भिन्न, पण जीवनशैली आणि जीवनमूल्ये ह्या बाबतीत एकमत. त्यामुळे मतभेद झाले तरी त्याने गलबत फुटले नाही.

काही उदाहरणांमध्ये, आक्रमकता आणि सोशिकपणा ह्यांची टोके एकत्र आलेली आणि त्यात सोशिकपणा अधिक कणखर ठरलेला . . हो, आम्ही सगळी उदाहरणं ‘नांदत्या’ नात्यांचीच घेतली होती. तर ‘तावून सुलाखुन’ निघायची एक पद्धत नाही मिळाली . . . बहुदा निरुपाय म्हणून फक्त वर्तनाच्या पातळीवर, समाजासाठी आणि मुलांसाठी म्हणून ओढत जाणारी उदाहरणे होतीच. वैयक्तीक जीवनामध्ये परंपरावादी पुरुषप्रतिमेला चिकटून रहाणारी पण सामाजिक जीवनात उदारता दाखवणारी जोडपीही मिळाली . . . व्यक्ती म्हणून एकमेकांचा आदर राखत, एकमेकांचं कर्तृत्व फुलवणारे होते तसेच स्वेच्छेने पडद्याआड राहून सहचरीचा किंवा सहचराचा प्रवास संपन्न करणारेही होते . . .

पतीपत्नीच्या कोणत्याच नात्यावर, एकच एक शिक्का नाही मारता येत . . . असंख्य पदर असतात त्यात . . . आदर्श नातं असं काही नसतं पण प्रभावी सहजीवन हवं असेल तर परस्पर आदर हवा आणि एकमेकांची मते नीट ऐकून ती समजून घेण्याचा संयमही हवा . . . त्या भांड्यामध्ये विविध व्यक्तीमत्त्वांच्या जोड्यांच्या पाककृती शिजू शकतात.

बोलताबोलता कधी झोप लागली समजलंच नाही.

गप्पांमधूनही खूप काही शिकायला मिळते हे कळण्यासाठी (म्हणूनच) दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *