औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त 33 वर्षीय गर्भवतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज एका गोंडस बाळाला दुपारी 12.40 वा.जन्म दिला. त्याचबरोबर चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या नऊ कोरोनाग्रस्तांपैकी आठ जणांचे पहिल्या चाचणीच्या लाळेचे नमुने (स्वॅब) निगेटीव्ह आल्याने दुसऱ्या चाचणीकरीता त्यांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
गरोदर महिलेचे यशस्वी अशी सिझेरियन शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कमलाकर मुदखेडकर, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कविता जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. पी.एम. कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. भारती नागरे, परिचारिका सुरेखा ढेपले, ज्योती दारवंटे, आशा मेरी थॅामस व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी या चमूने केली. शस्त्रक्रिया गृहामध्येच (ऑपरेशन थिएटर) बाळाचे तीन स्वॅब तपासणीसाठी घेतले. याच महिलेच्या 15 वर्षीय मुलाची चाचणी काल रात्री (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आलेली आहे.
मिनी घाटीमध्ये 61 रूग्णांची आज तपासणी करण्यात आली. त्यातील 11 जणांना घरीच अलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याचा सल्ला दिला. 23 जणांना भरती करून घेतले आहे. एकूण 26 स्वॅब घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) पाठविले आहेत. काल आणि आजच्या पाठविलेल्या स्वॅबपैकी चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यांनाही औषधी देऊन घरी पाठविले आहे. 37 जणांच्या स्वॅबचे रिपोर्ट येणे प्रतीक्षेत आहे. सध्या मिनी घाटीतील कोविड 19 विलगीकरण कक्षात एकूण 23 जणांवर उपचार सुरू आहेत. चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका रूग्णाचा पहिला स्वॅबचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आलेला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या 65 वर्षीय महिलेच्या मृत्यूसह एकूण तीन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिनी घाटीत 23, खासगी रुग्णालयात एक अशा एकूण 24 कोरोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, असेही डाॅ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत आज 17 रूग्णांची तपासणी झाली. यापैकी तिघांचे स्वॅब प्रयोगशाळेस पाठवले. दोघा जणांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. दोन कोविड संशयित, 23 कोविड निगेटीव्ह असे एकूण 25 रूग्ण घाटीत भरती आहेत. यापैकी एका संशयित कोविड रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचेही डॉ. गायकवाड म्हणाले.