मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
मुंबई: संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या महत्वाकांक्षी अशा १६८० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थित राहणार आहेत.
औरंगाबाद शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून पाईपलाइन टाकली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोविडमुळे या कामांचे उद्घाटन रखडले होते. परंतु आता त्याला गती मिळणार आहे. शनिवारी, १२ डिसेंबर रोजी गरवारे स्टेडियम परिसरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. याबरोबर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री.देसाई म्हणाले, १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगर पालिकेच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळे शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. संभाजीनगर शहरात नव्याने समाविष्ठ झालेल्या सातारा-देवळाई परिसराला या योजनेचा लाभ मिळणार आहे. २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख होणार असून त्यावेळच्या लोकसंख्येला पाणी पुरविण्याचे याव्दारे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही.
योजनेचे खासगीकरण होणार नाही:
दरम्यान, या योजनेचे खासगीकरण होणार नाही, नागरिकांवर कुठल्याही प्रकारे अतिरिक्त बोजा पडणार नसून वाजवी दरात नागरिकांना पाणी मिळणार आहे.
पाणीपुरवठा योजनेसोबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान तसेच जंगल सफारी पार्क व रस्त्याच्या कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. विविध विकास कामांच्या अनुषंगाने या शहराचे सुपर संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, शहरवासियांचे जीवन अधिक सुखकर करणार असल्याचे श्री.देसाई यांनी नमूद केले.
पाणीपुरवठा योजनेची वैशिष्ट्ये:
१)पाणीपुरवठा प्रकल्पाची एकूण किंमत १६८०.५० कोटी इतकी आहे. हा प्रकल्प जायकवाडी धरण उद्भवावरून मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात राबविलेल्या प्रकल्पांपैकी हा एक सर्वात मोठा पाणीपुरवठा प्रकल्प आहे.
२)तूर्तास ही योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून मंजूर करण्यात आली आहे.
३)भविष्यात केंद्र शासनाची नवीन योजना मंजूर झाल्यानंतर या योजनेला केंद्र शासनाच्या नवीन योजनेंतर्गत अर्थसहाय्य पुरविण्यात येणार आहे.
४)ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून त्याचे कार्यन्वयन पूर्णपणे जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार आहे.
५)या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व औरंगाबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त प्रकल्प व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात आले आहे.
६)या योजनेच्या कामाचे आदेश मे. जी.व्ही.पी. आर. इंजिनिअर्स, हैदरबाद या कंत्राटदारास देण्यात आले आहेत.
७)संभाजीनगर शहराची सध्याची अंदाजित लोकसंख्या १५ लक्ष असून २०५२ मध्ये सुमारे ३३ लक्ष होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने या योजनेची संकल्पना करण्यात आली आहे.
८)शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसरासह संपूर्ण शहराची गरज या योजनेत विचारात घेण्यात आली आहे.
९)शहराची खूप दिवसांपासूनची पाणी पुरवठ्याची गरज या योजनेद्वारे पूर्ण होणार आहे.
१०)या योजनेमध्ये प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उद्भव विहीर (Jack Well) व पंपगृह, ३९२ MLD एवढ्या क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र, शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी एकूण ५३ जलकुंभ (४९ उंच पाण्याच्या टाक्या व ४ जमिनीवरील पाण्याच्या टाक्या), सुमारे ४० कि.मी. अशुध्द पाण्याची पाईपलाईन, ८४ कि.मी. पाणी वाहून नेणारी पाईपलाईन व १९११ कि.मी. वितरण व्यवस्था, सुमारे ९०,००० घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी, एक्स्प्रेस फिडर हे घटक समाविष्ट आहेत.
११)या योजनेतील जलशुध्दीकरण केंद्र हे नक्षत्रवाडी येथे उभारण्यात येणार आहे. त्याबाबतची जमीन देखील महानगरपालिकेच्या नावावर आहे.
१२)योजना पूर्ण होण्यास अंदाजे ३ वर्षाचा कालावधी लागणार आहे.
स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, स्मारक:
महानगरपालिकामार्फत सिडको एन-६ येथील ७ हेक्टर (६७६०० चौ.मी) क्षेत्रावर स्व.मा.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक उभारले जाणार आहे. पालकमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत स्मारकाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुतळा उभारणे, म्युझियमसाठी इमारत बांधणे तसेच परिसराचा विकास करणे आदी कामे केली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मंजुरीनंतर स्थापत्य विषयक कामांसाठी१७.६१ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विद्युतीकरणासाठी ३.८६ कोटीच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता (विद्युत) सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांची तांत्रिक मान्यता प्रदान झालेली आहे.
संभाजीनगर सफारी पार्क:
मराठवाड्यातील वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या सफारी पार्क उभारले जाणार आहे. मिटमिटा परिसरात या प्रकल्पासाठी शासनाने ८४ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाच्या बृहत आराखड्यास केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. प्रस्तावित सफारी पार्कमध्ये मुख्यत्वे १०० विविध प्रकारच्या प्रजाती असतील. ज्यामधील ४० टक्के प्रजाती या मराठवाड्यातील असतील. ४० टक्के प्रजाती या पश्चिम भारतामधील तर १० टक्के प्रजाती उर्वरित भारतामधील तर १० टक्के भारतीय उपखंडातील असतील. या प्रस्तावित सफारी पार्क मध्ये वर्षभरात अंदाजित १० लाख पर्यटक भेटी देतील. तीन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
१) टप्पा-१: सफारी पार्क च्या सभोवताली संरक्षक भिंत, गेट व सपाटीकरणाचे काम केले जाणार आहे.
२)टप्पा- २: सफारी पार्कमधील अंतर्गत रस्त्याचे काम, फुटपाथ, इलेक्ट्रिक सिस्टीम, अंतर्गत पाणीपुरवठा प्रक्रिया, अंतर्गत कचरा विल्हेवाट, सांडपाणी विल्हेवाट प्रक्रिया, पार्किंगची जागा बांधणे आणिअन्य अंतर्गत इमारतीचे बांधकाम केली जाणार आहेत.
३)टप्पा -३: प्राण्यांसाठी पिंजरा व इतर आवश्यक बाबींचे काम केले जाईल. टप्पा १ मधील कामासाठी निविदा मागविण्यात आलेल्या होत्या व त्यानुषंगाने निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.
शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी मंजूर:
औरंगाबाद शहरातील व चिकलठाणा एमआयडीसी परिसरात एकूण २३ रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी शासनाने १५२.५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महानगरपालिका, एमआयडीसी, रस्ते विकास महामंडळ यांच्यातर्फे रस्त्याची कामे केली जाणार आहेत. MSRDC यांना रक्कम रु.५१.७६ कोटी (एकूण ०७ रस्त्यांसाठी ६.८१ कि.मी करिता), MIDC यांना रक्कम रु.५०.०४ कोटी (एकूण ०७ रस्त्यांसाठी ८.७९ कि.मी करिता) व औरंगाबाद महानगरपालिकेस रक्कम रु. ५०.५८ कोटी (एकूण ०९ रस्त्यांसाठी १०.०२ कि.मी. करिता) कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निश्चित केले आहे. महानगरपालिकातर्फे करण्यात येणाऱ्या एकूण ०९ रस्त्यांच्या कामाकरिता शासन निर्णयानुसार तृतीय पक्षतांत्रिक लेखा परीक्षणाकरिता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकातर्फे रोडच्या कामाकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून रोडचे काम लवकरच सुरु होणार आहे.