# संसदेचं अधिवेशन रद्द झाल्यामुळं राज्यातील भाजप नेत्यांची गोची.

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची केंद्राच्या या निर्णयामुळं पुरती गोची झाली आहे.

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात आला. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार प्रश्नांपासून पळ काढतंय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीज बिल, शक्ती कायदा व पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे आठवे आश्चर्यच आहे, असा टोलाही भाजप नेत्यांनी हाणला होता.

दरम्यान, संसद अधिवेशन रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला घेरलं आहे. ‘राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारनं कोविडमुळं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्दच केलं. आता मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार? असा बोचरा सवाल सावंत यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *