पुणे: देशाच्या पूर्व भागात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यातही दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ झाली असली तरी, या लाटेच्या प्रभावामुळे धुके आणि गारवा जाणवत असून, शहरातही तापमानाची ही स्थिती दिसून येत आहे. हवामान विभागातर्फे शहर परिसरात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
विभागाच्या नोंदीनुसार, बुधवारी (दि.16) शिवाजीनगर येथील वेधशाळेत 16.2 अंश सेल्सिअस, पाषाण येथे 16.8 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे 17.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. राज्यात महाबळेश्वर येथे सर्वात कमी म्हणजेच 15.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. मात्र, असे असतानाही, देशाच्या पूर्व भागात म्हणजेच राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यात थंडीची लाट असून, या लाटेचा काहीसा प्रभाव राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी दाट धुके आणि हवेत गारवा वाढला असल्याची नोंद विभागातर्फे घेण्यात आली आहे. पुण्यातही पहाटे तसेच संधाकाळी विविध भागांमध्ये धुक्याची चादर पसरत आहे.
धुक्यामुळे दृष्यता कमी होत असल्याने पहाटे तसेच संध्याकाळी वाहन चालकांना काहीसा अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर शहरातील हवामान कोरडे राहील, तसेच थंडीत वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.