मुंबई: राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महानिर्मिती’चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, आमदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व त्यासमान मानधन देण्यात यावे. याचबरोबर कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्यात यावे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ.राऊत यांनी दिले.