मराठी समीक्षेत नवा विचारप्रवाह आणणारे समीक्षक म्हणून द. ग. गोडसे यांची मोठी ख्याती आहे. कलामीमांसा, नाटक, एकांकिका, इतिहास संशोधन यासह त्यांनी विविध विषयावर केलेले लेखन सतत चर्चेत राहिले आहे. ‘गोडसे यांच्या कुतुहलाचे आणि अभ्यासाचे विषय अनेकविध आहेत. चित्रकलेचे खास शिक्षण त्यांनी परदेशात घेतले. संस्कृत मराठी इंग्रजी साहित्य इतिहासाच्या अभ्यासासाठी लागणारी दप्तरे, रुमाल, शिलालेख, संस्कृत, मोडी, पर्शियन या भाषांचे ज्ञान त्यांनी मिळवले आहे. संगीत, मूर्तिकला, नेपथ्य, नाट्य यांचा ही व्यासंग त्यांनी ठेवला आहे. सर्व क्षेत्रातील जाणकारी त्यांनी आपल्या समीक्षा विचाराला उपलब्ध करून दिली आहे. किंबहुना या जाणकारीतूनच त्यांचा विचार निष्पन्न झालेला आहे.’ म. द. हातकणंगलेकर यांचे हे विचार लक्षात घेतले की, गोडसे यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा कलाविचार समजून घेणे अधिक सुलभ होते. त्यांच्या प्रतिभेचे अनेक पैलू वाचक आणि अभ्यासकांनी पाहिले आहेत.
गोडसे यांची समीक्षेतील कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिनव राहिलेली आहे. कला आणि साहित्याकडे पाहण्याची त्यांची स्वतंत्र दृष्टी होती. ‘पोत’, ‘शक्तीसौष्ठव’, ‘गतिमानी’, ‘लोकधाटी’, ‘मातावळ’, आणि ‘ऊर्जायन’ ही त्यांची महत्त्वाची साहित्यसंपदा आहे. त्यांची कलामीमांसा मराठी समीक्षेत महत्त्वाची ठरली आहे. गोडसे यांचा जन्म 1914 चा. सौंदर्यशास्त्र हा त्यांच्या आस्थेचा विषय. कलादिग्दर्शन आणि नेपथ्यासह पुस्तकांची अंतर्बाह्य सजावट करण्याचे कामही त्यांनी केले. टाइम्स ऑफ इंडिया, भारत सरकारच्या ब्रॉडकास्टिंग अँड इन्फर्मेशनसह बडोदा आणि मुंबई विद्यापीठात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. 1992 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
‘पोत’ हे त्यांचे पहिले पुस्तक सुमारे सत्तावन वर्षांपूर्वी म्हणजे 1963 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाची चर्चाही पुष्कळ झाली. अगदी दि. के. बेडेकर, कुरुंदकर, मुक्तिबोध, पु.शि. रेगे, म. वा. धोंड, म.सु. पाटील, भ. मा. परसवाळे अशा दिग्गजांनी यावर लिहिले. एवढेच नाही तर ‘गोडसे यांच्या विचारांचे अनोखेपण कशात आहे ते जाणून घेण्यासाठी’ 1990 मध्ये मुंबई विद्यापीठाने एका चर्चासत्राचे आयोजनही केले होते. ‘ द. ग. गोडसे यांची कलामीमांसा ‘ हा ग्रंथ यातूनच सिद्ध झाला. सरोजिनी वैद्य आणि वसंत पाटणकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. पोतच्या संदर्भात यात म.सु. पाटील, हरिश्चन्द्र थोरात आणि राजीव नाईक यांचे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत.
कला आणि साहित्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या गोडसे यांनी कापडाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचा विचार करून आविष्कार यंत्रणा कशी बदलत जाते याची मांडणी केली आहे. म्हणूनच ‘पोत’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ मानला जातो. गोडसे यांची कलामीमांसा बहुपदरी आहे. तिला अनेक शास्त्रांचे पैलू आहेत. या पैलूंना समोर ठेऊनच ते विशिष्ट परिप्रेक्षात कलाकृतीचा विचार करतात. ‘प्रत्येक आविष्काराला अंगभूत असे पोत असते आणि हे पोत त्या आविष्काराचा एक अविभाज्य घटक असते. कोणत्याही कलात्मक आविष्काराचे पोत तर उघडच प्रतीत होते. अकलात्मक आविष्काराचे पोतही त्या पोताचा दर्जा काहीही असो- दृष्टीने न्याहाळल्यास चोखंदळ निरीक्षकास दिसू शकते.’ असे सांगून त्यांनी कलात्मक आविष्काराच्या पोतासंबंधी विवेचन केले आहे.
कापडातील पोत असा व्यवहारातील शब्द आहे. ही संकल्पना ते पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात. ‘पोत म्हणजे ताणा व बाणा यांची विशिष्ट जागेत करण्यात आलेली वीण. या विणेतील धाग्यांच्या संख्येवरून पोताची प्रतवारी ठरते. ‘पोत ही संकल्पना विस्तृतपणे स्पष्ट करताना त्यांनी पोताचे घटक, पोत घटवणारी यंत्रणा यांचे परस्परसंबंध याविषयी लिहिले आहे. आणि यातूनच ते एक अभिनव असे समीकरण वाचकांच्यापुढे ठेवतात. ते समीकरण असे :
धागा = तत्त्व विषद करणारी जाणीव
ताणाबाणा = या जाणिवांची आडवी उभी वीण
यंत्रणा = जाणिवांचा आविष्कार घडवून आणणारे माध्यम (भाषेचे, चित्रांचे शिल्पांचे.)
‘प्रत्येक कलात्मक आविष्कार म्हणजे कलावंताने जीवनावर केलेले भाष्य ठरते.’ किंवा ‘प्रत्येक आविष्काराच्या निर्मितीची प्रेरणा कलावंताला त्या त्या कालखंडातील जीवनविषयक निष्ठांमधूनच मिळते. ‘ ही त्यांची भूमिका लक्षात घ्यायला हवी.
साहित्य, चित्र व शिल्प इ. कला आविष्काराच्या संदर्भात त्यांनी या ग्रंथात ‘तंतु आणि ओतु ‘, ‘कुंजरछब्बीसाणो ‘, ‘मुर्डीव शुंडा दंड… ‘ आणि ‘दृष्टता तु पांडवानीकम’ या चार प्रकरणातून विचार मांडला आहे. अर्थात या पोत विचारावर अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या. काहींनी या संकल्पनेचे स्वागत केले तर काहींनी ही संकल्पना आणि तिचे उपयोजनही निष्फळ ठरवले आहे. मात्र, असे असले तरी या ग्रंथाचे वाड्मयीन महत्त्व कमी होत नाही. सामाजिक, तात्त्विक आणि कलात्मक मूल्यमापनाच्या दृष्टीने हा ग्रंथ उपयुक्त ठरतोच.
रेषा व रंगांच्या योजनाबद्ध वापरातून साकारलेल्या चित्राचे स्वभावभेद कसे दिसून येतात. याविषयी त्यांनी विस्ताराने स्पष्टीकरण दिले आहे. इ. स. वीस हजार वर्षापूर्वी अश्मयुगीन मानवाच्याही आधी आदिमानवाने गुहांतून कोरलेली चित्रे हे आदिमानवाचे अतिप्राचीन कलात्मक आविष्कार असल्याचे आणि रेषा ही चित्रणयंत्रणेचा महत्त्वाचा घटक असल्याचे ते नोंदवतात. या संदर्भातले त्यांचे प्रतिपादन विस्ताराने वाचायला हवे.
आविष्कार यंत्रणेत कसा बदल होतो हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी जातक कथेतील छद्दंत कथेच्या आठशे वर्षावर पसरलेल्या वेगवेगळ्या काळातील आविष्कारांचा विचार केला आहे.
व्यास आणि ज्ञानेश्वर दोघेही श्रेष्ठ प्रज्ञेचे कवी आहेत ; पण दोघांच्या आविष्काराच्या पोताची जात, आविष्कारमाध्यमाची तांत्रिक स्थिती भिन्नभिन्न असल्याचे ते सांगतात. शिवाय भगवदगीतेतील पहिल्या अध्यायाचे एकोणवीस श्लोक व गीतेवरील भावार्थदीपिका ही प्रसिद्ध टीका – यावरील मराठी भाष्य, या आविष्काराचे पोत ते तारतम्याने तपासतात.
स्पेन, सांची, अजिंठा येथील चित्रे आणि शिल्पचित्रे देखील या पुस्तकात आहेत. याच्या आधारे ते चित्रणतंत्र आणि कलात्मक दर्जा तपासतात. गोडसे यांची ही मीमांसा मराठी समीक्षेने फारसी स्वीकारली नाही, हे खरे असले तरी कलासमीक्षेच्या दृष्टीने ती मौलिक नक्कीच आहे.
-डॉ. पी. विठ्ठल
(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)
इमेल: p_vitthal@rediffmail.com>
संपर्क: ९८५०२४१३३२