# वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांशी संवाद साधून संभ्रम दूर करणार

महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे कर्मचारी संघटनांच्या बैठकीत प्रतिपादन

पुणे: कोरोना कालावधीमधील वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आर्थिक संकट गडद झाले आहे. अशा स्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. वीजग्राहकांना तत्परतेची व आपुलकीची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेच. सोबतच येत्या मार्चपर्यंत वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी ग्राहकसंवादाचे सर्वतोपरी प्रयत्न करीत राहू असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी कर्मचारी संघटनांच्या संवाद कार्यक्रमात केले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे 60 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी श्री. नाळे यांनी मंगळवारी (दि. 5) नववर्षानिमित्त व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 2020 वर्षाचा मागोवा घेत कोरोना संकट, ‘निसर्ग’ चक्रीवादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचे श्री.नाळे यांनी विशेष कौतुक केले.

पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री.नाळे म्हणाले, की वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभुतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकत्रितपणे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या मार्च 2021 पर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीजग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर रहा. यासोबतच महावितरणच्या महसुलाकडे बारकाईने लक्ष ठेवा. मीटर रिडींगमध्ये एजन्सीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करा. महावितरणच्या विविध कामांवर लक्ष ठेवा. काही चुकीचे आढळल्यास त्याची माहिती संबंधितांना देण्यात यावी. वीजक्षेत्रामधील खासगीकरणाशी संबंधित संभाव्य बदल हे आव्हानात्मक आहेत. मात्र, महावितरण ही सरकारी पर्यायाने जनतेच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे महावितरणला सध्याच्या ग्राहकांशी थेट संवाद साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील संवाद साधावा. वीजक्षेत्रातील संभाव्य विपरित परिस्थिती आणि महावितरणचे अस्तित्व टिकविण्याची गरज आदींची त्यांना माहिती देण्यात यावी. आपले वीजग्राहक चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करून निश्चितपणे सहकार्य करतील असा विश्वास प्रादेशिक संचालक (प्र.) श्री.नाळे यांनी व्यक्त केला.

या संवाद कार्यक्रमात यावेळी उपमहाव्यवस्थापक (मासं) अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर (पुणे), श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स, इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत श्रमिक कँग्रेस इंटक, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी, वीज कामगार काँग्रेस इंटक, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, अधिकारी संघटना, वीज तांत्रिक कामगार संघटना, बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम, कार्यालयीन कर्मचारी संघटना, वर्कर्स युनियन, राष्ट्रवादी वीज कामगार कँग्रेस, भारतीय कामगार सेना, नवनिर्माण वीज कर्मचारी जनाधिकार सेना, लाईन स्टाफ असोशिएशन आदी संघटनांचे प्रादेशिक, परिमंडल व मंडलस्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *