# मला जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करायची आहे, व्हायरसची नाही –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

 

मुंबई:  २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान ३ मे पर्यंत हे बंधन आहे. मला अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, माल यांची वाहतूक करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी केले.

लाइव्ह प्रसारणाद्वारे आज त्यांनी जनतेशी संवाद साधला. शत्रू समोर असेल तर एक घाव दोन तुकडे केले असते पण हा शत्रू दिसत नाही आहे. आपण जिद्दीने लढतो आहोत. उद्या हे युद्ध सुरु होऊन ६ आठवडे होतील. काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के निगेटिव्ह ३६०० पॉझिटिव्ह आहेत. समाधान हे आहे की, ७५ टक्के अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. ५२ रुग्ण गंभीर असून गंभीर रुग्णांना वाचवणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बऱ्याच वेळा हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. काही बाबतीत तर चाचणीचा अहवाल येण्याच्या आतच त्या रुग्णाचे निधन झाले आहे असे लक्षात येते. कोणतेही लक्षण लपवू नका. न घाबरता फिव्हर क्लिनिकमध्ये लगेच जा. लवकर या, लवकर इलाज होईल. गंभीर झालेले रुग्ण देखील बरे झाले आहेत. पण वेळेत आले पाहिजे. काल संध्याकाळी खासगी क्लिनिक आणि डॉक्टर्सशी बोललो. ते देखील लढ्यासाठी तयार आहेत. हे सर्व जण आज उद्यापासून कोरोना नसलेल्या रुग्णांना तपासतील.

डॉक्टर्सना आवाहन आहे की घाबरू नका. सरकार जिथे शक्य आहे ती सर्व वैद्यकीय उपकरणे आपणास देईल. गोर गरिबांपर्यंत ८० ते ९० टक्के धान्य पोहचवले आहे. केशरी शिधापत्रिकावाल्यांना सुद्धा आता मिळण्यास सुरुवात होईल. केंद्र या अन्न धान्य पुरवठ्यात मदत करते आहे. काही जण म्हणत आहेत की केंद्र तर मोफत धान्य देते आहे, पण मी हे सांगू इच्छितो की केंद्र केवळ तांदूळ देते आहे, ते सुद्धा अन्न सुरक्षा योजनेतील लोकांसाठी. आम्ही यासाठी गहू,  डाळीची मागणी केली आहे. लवकरच तो पुरवठा केंद्राकडून केला जाईल अशी आशा आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांत घट होते आहे. पण मला भ्रमात राहायचे नाही. आकडेवारी वर खाली होते आहे. २० तारखेपासून आपल्याला हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे. काही जिल्हे शून्य रुग्णाचे आहेत, काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज, ग्रीन असे झोन केले आहेत. काही निवडक ठिकाणी आम्ही  माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असाल, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करीत असाल तर मान्यता मिळेल.

शेती आणि कृषी, जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही हे देखील मी सांगू इच्छितो. २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान ३ मे पर्यंत हे बंधन आहे. मला अत्यवश्यक आणि जीवनावश्यक वस्तू,  माल यांची वाहतूक करायची आहे, व्हायरस ची वाहतूक करायची नाही

पत्रकार बांधवाना सांगतोय. वितरणावर बंदी नाही, स्टॉल्सला परवानगी आहे. मात्र, घरी वितरण नको. माझी भीती अनाठायी असेलही. तुम्ही मी चांगले काम करतो म्हणून कौतुक करीत आहात पण आपण टीकाही केली तरी महाराष्ट्रासाठी मी वाईटपणाही स्वीकारेल. ही आरोग्य आणीबाणी आहे आणि त्यात मला धोका पत्करायचा नाही. मी काही संपादक आणि मालक यांच्याशीही बोलून त्यांना समजावून संगितले आहे.  मी आज परत सांगतो की,  नागरिकांनी खूप आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा.

अँन्टी कोरोना पोलिससारखे चांगले उपक्रम राबविले जात आहेत. लहान लहान मुलं वाढदिवसाला साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देताहेत. मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते.  मी त्यांना खात्री देतो की आमची पिढी हे सर्व सांभाळायला खंबीर आहे. ज्यांना सीएसआर म्हणून या निधीत द्यायचे आहे, त्यांच्यासाठी वेगळे खाते सुरु केले आहे.

या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांना मी विनंती करतोय तर १०० नंबर फिरवा. याशिवाय मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८००१२०८२००५० क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग / प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या १८००१०२४०४० क्रमांकावर जरूर संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *