पुुण्यातील नवीन कमांड रुग्णालयाचे उद्घाटन
पुणे: लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी आज पुणे स्थित दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती यांनी जनरल एम.एम. नरवणे यांचे स्वागत केले आणि विविध सामरीक आणि प्रशिक्षण संबंधी मुद्द्यांबाबत त्यांना माहिती दिली.
देशात विविध प्रकारच्या मानवतावादी कार्यात मदत आणि आपत्ती निवारण कार्यात दक्षिण कमांडच्या सैन्याने दिलेल्या योगदानाविषयी, विशेषतः कोविड-19 आणि पुराच्या आपत्तीच्या वेळी नागरी प्रशासनाला पुरवलेल्या मदतीबद्दलही लष्कर प्रमुखांना अवगत करण्यात आले. सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळातही उच्च दर्जाची सज्जता आणि प्रशिक्षण कायम राखल्याबद्दल जनरल एम.एम. नरवणे यांनी दक्षिण कमांडचे कौतुक केले. जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रम व कल्याणकारी प्रकल्पांचीही त्यांनी प्रशंसा केली. कोविड-19 महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रयत्नात सैन्याच्या कटिबध्दतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पुुण्यातील नवीन कमांड रुग्णालयाचे जनरल एम.एम. नरवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असून त्यामध्ये सशस्त्र दल आणि माजी सैैनिकांना आरोग्यसुविधा मिळणार आहे.