अमेरिकेच्या राजधानीत ६ जानेवारी ला जे काही घडले, त्यामुळे तेथील नागरिकच नव्हेत, तर सगळ्या जगाला, त्यातल्या त्यात लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक देशाला अन् सुजाण नागरिकाला प्रचंड धक्का बसलाय. दोन देशात युद्ध झाले तर त्यामागे काही एक विचार असतो. हक्कांची मागणी असते. हा हक्क योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण त्यात वैयक्तिक स्वार्थ क्वचितच असतो. एखाद्या न्याय्य मागणीसाठी समूह लढत असतो. अमेरिकेत जे काही घडले ते ट्रम्प नावाच्या एका उद्दाम, सत्तांध, अविवेकी, लालसी, किंबहुना राक्षसी, मनोवृत्तीचे गलिच्छ प्रदर्शन दिसले! तिथे समूह होता. पण तो देखील ट्रम्प यांचे वरील दुर्गुणांचे मुखवटे घातलेला, अतिरेकी, राष्ट्रद्रोही, अमानवीय माणसाचा गोतावळा. ट्रम्प सारख्या राक्षसी मनोवृत्तीला पाठिंबा देणारेही एवढ्या संख्येने लोक असू शकतात हे विश्व ची माझे घर, या सांघिक एकीकरणाचा ध्यास घेणाऱ्या लोकशाहीवादी राष्ट्रासाठी अनपेक्षितच म्हणायला हवे. ट्रम्पची विष प्रवृत्ती व्यक्ती पुरती मर्यादित राहिली नाही, तिने संघटनात्मक रूप धारण केले. या मंडळींचा कुणावरही विश्वास नाही. राज्यघटना, लोकशाही, न्याय व्यवस्था, कायदा, राज्य प्रशासन, निवडणूक आयोग, काँग्रेस मधील सभासद, अधिकारी.. कुणावरही त्यांचा विश्वास नाही. हम करे सो कायदा, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, हा त्यांचा हुकूमशाही पावित्रा! जगातल्या मोठ्या, प्रगत, लोकशाही राष्ट्राचा हा युद्ध न करताच झालेला दारुण पराभव आहे!
गेल्या काही दशकांत, पाश्चिमात्य देशात हळूहळू जो सत्तांध चंगळवाद फोफावतो आहे त्याची ही शोकांत परिणीती! या ट्रम्प वादी मनोवृत्तीत राष्ट्रप्रेम, लोकशाही, घटना, न्यायप्रणाली, कायदे, यापैकी कुठल्याही मूल्याविषयी आस्था नाही. प्रेम नाही. श्रद्धा वगैरे राहिली दूरच. त्यांचे हातपाय फक्त स्वार्थाच्या चिखलाने बरबटलेले आहेत. तरी बरे या माणसाने चांगली चार वर्षे सत्ता उपभोगली आहे.अमेरिकेच्या जनतेनेच नव्हे तर, साऱ्या जगाने या हटवादी, वाचाळ, स्वार्थी, अतार्किक प्रमुखाला त्याच्यात कसलेही नैतिक गुण नसूनही सहन केले आहे. त्या कमावलेल्या भल्याबुऱ्या पुण्याच्या भरवशावर तरी आता त्याने चूप बसायचे! पण नाही. माणसाला एकदा सत्तेची लालसा निर्माण झाली की तिला अंत नसतो हेच खरे. आतापर्यंत आपण फक्त हिटलरच्याच नावाने बोटे मोडत होतो. आता त्यात आणखीन एक भर पडली ट्रम्प महाशयांची. खरे तर एकदा सत्ता उपभोगल्या नंतर ट्रम्प सारख्या माणसाने पुन्हा निवडणुकीला उभेच राहायला नको. अमेरिकेत सुजाण, टॉवर पर्सनेलिटी ची बुद्धिमान नेत्यांची कमी आहे की काय? ट्रम्प याचे आधीचे प्रताप गृहीत धरूनही त्यांना, दुसऱ्यांदा इतकी मते अमेरिकन नागरिकांनी द्यावीत, या बौद्धिक दिवाळखोरी ला काय म्हणावे? हे राजकीय पंडितानी तोंडात बोटं घालावीत असे आक्रीत आहे! हा स्वयंकेंद्री, आत्मनिष्ठ अविचारी माणूस इतकी मते खिशात घालून दिमाखात मिरवतो, एव्हढेच नव्हे तर निर्णायक हार झाल्या नंतरही खेळीमेळीने पराभव न स्वीकारता, मेरे मुर्गी की एकही टांग, म्हणून फणा वर काढून फुत्कारतो, हे भविष्यात सुदृढ, सुजाण, शांतताप्रिय लोकशाही साठी निश्चितच धोकादायक आहे. हा विरोध नाही. हा तात्त्विक निषेध नाही. हा सरळ सरळ राष्ट्रद्रोह आहे. हे अतिरेक्यांचे देशविरोधी, लोकशाही विरोधी, न्याय प्रणाली विरुद्ध, किंबहुना एकूणच शांतताप्रिय जगाविरुद्ध पुकारलेले माथेफिरू बंड आहे. या बंडाचा बिमोड कसा करायचा हे अमेरिकेचे नागरिक ठरवतील. तिथली राज्यघटना ठरवेल. तिथली न्यायव्यवस्था ठरवेल. पण ही बंडाळी आता अमेरिकेपूर्ती मर्यादित राहणार नाही. ही धोक्याची राक्षस घंटा आहे. लोकशाही वर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शांतताप्रिय राष्ट्रासाठी हा गंभीर इशारा आहे. रात्र वैऱ्याची आहे, जागते रहो असे निक्षून, ओरडून बजावणारा संभाव्य धोक्याचा इशारा आहे.
आपण व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, ह्यूमन राईट्स वगैरेंच्या गोष्टी करतो. ते घटनेत आहेच. पण त्यास बरोबर काही जबाबऱ्या देखील आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी स्वैराचार, करणार असेल, घटनेलाच पायदळी तुडविणार असेल, देश गेला खड्ड्यात, माझेच काय ते खरे असे म्हणणार असेल तर तो विषारी फणा वेळीच घटनेच्या, न्याय देवतेच्या हातोड्याने ठेचला पाहिजे. अशी विषवल्ली फोफावता कामा नये. अशा अवमूल्याना वेळीच आळा घालावा लागेल. तिलांजली द्यावी लागेल. सध्या ही समस्या अमेरिके पुरती मर्यादित वाटत असली तरी,चीन मधून आलेल्या कोरोना विषाणू ने जसे बघता बघता साऱ्या जगाला कवेत घेतले, तसे ही अमेरिकेतली स्वार्थी, आत्ममग्न, सत्तापिपासू, ट्रम्प शाही इतर शांतताप्रिय लोकशाही वादी देशातही पसरू शकते. आपल्या कडील गेल्या काही वर्षातील आंदोलने (इतकी टोकाची नसली तरी) त्याची झलक दाखवण्या इतपत पुरेशी आहेत. स्वातंत्र्य म्हणजे नंगा नाच नव्हे, हे घटनेने, सरकारने, न्याय व्यवस्थेने नागरिकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. जखमा चिघळत ठेवल्या, की ते विष पसरत जाते. सर्वांग त्या विषाणू ने पोखरण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच अशा बाबतीत उपाय योजना करायला हवी. राजकीय डावपेच म्हणून सुद्धा टाळमटाळ करणे धोकादायक ठरू शकते. इथे एका व्यक्तीच्या, पक्षाच्या, अमुक विचारसरणीच्या अस्तित्वाचा किंवा भविष्याचा प्रश्न नसतो. संपूर्ण राष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. अमेरिकेत सहा जानेवारी ला ट्रम्प च्या तुतारीने साऱ्या जगाला खडबडून जागे केले आहे. सावध ऐका पुढल्या हाका हा धोक्याचा इशारा दिला आहे. आपले कान, डोळे, विचार, बुद्धी बधीर होण्या आधीच आपण हा इशारा गामभीर्याने घेतला पाहिजे. मागच्याला ठेच लागली की पुढच्याने सावध होण्यालाच शहाणपण म्हणतात. जगाचे नेतृत्व कुठल्या मनोवृत्ती ने करायचे हे ठरविण्याची हीच ती वेळ.
-डॉ. विजय पांढरीपांडे
लेखक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू आहेत.
मोबाईल: 7659084555
ईमेल: vijaympande@yahoo.com