पशुपक्षी.. प्राणी.. यांच्यामधील सोशल डिस्टंन्सिगमधून बरेच शिकायला मिळाले. अरण्ययोगी, निसर्गचित्रणाची हिरवी वाट दाखविणारे वनविद्येचे अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्याकडून ! राज्यपक्षी म्हणून ओळखला जाणारा हरोळी..हरियाल..(Green pigeon) हा पक्षीसुद्धा सोशल डिन्स्टन्स ठेवून समूहाने राहणारा पक्षी. या पक्ष्याचा आधिवास हा गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे. हा पक्षी नेहमी थव्यानेच सोशल डिस्टन्स ठेवूनच राहतो. पक्षीनिरीक्षणांच्या वेळी या हरोळी.. हरियालच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात अनेक प्रतिमा, नोंदी मी घेतल्या आणि त्या कायम मनात राहिल्या. या पक्ष्याला विहारासाठी पहाट, सकाळ आवडते. याच्या विणीचा हंगाम मार्च ते जून या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात. मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही सापडतो..
सन 2007 मध्ये नागपुरात विधीमंडळ अधिवेशन काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे तत्कालिन संचालक प्रल्हाद जाधव यांच्या प्रेरणेने, मारूती चितमपल्ली यांच्या सहवासात डिसेंबरच्या थंडीत हरोळीचे निरीक्षण व छायाचित्रण करण्याचे ठरले. मग सकाळी 6 ते 8 यावेळेत चितमपल्ली सरांना 5:30 ला घेवून हरोळीचा अधिवास असलेल्या भागात हरोळीचा शोध घेत त्यांची अभ्यासपूर्ण निरिक्षणे चितमपल्ली यांच्याकडून ऐकत ऐकत मिळेल त्या हिरव्या गर्द वड-पिंपळाच्या झाडावर सकाळी सकाळी अगदी तांबडं फुटल्यावर कोवळ्या उन्हाच्या साक्षीने असंख्य छायाचित्रे टिपली. या भित्र्या, लाजाळू, नाजूक, चतुर हरोळीची छायाचित्रे टिपता टिपता खूप महत्वाचं असायचं ते चितमपल्ली यांचे हरोळी बाबतचं निरीक्षण. ते त्यांच्या अनुभवाला शब्दरूप देवून जे सांगत ते शेकडो पुस्तके वाचून कळणार नाही असे असायचे. ते त्यावेळी लिहून घेणे तर शक्य नसायचे पण मनापासून ऐकल्यामुळे मनावर कोरले जायचे. आज लाॅकडाऊनच्या काळात ते सारे आठवत आहे. त्या आठवणी लिहिण्याचा प्रयत्न करताना, सांगायचे ऐवढेच की समूहाने राहणार्या या पक्ष्याचे निरिक्षण आणि छायाचित्रण करताना त्यांच्यातील सोशल डिस्टंन्सिग. समूहशक्ती, ऐकमेकांची काळजी घेण्याची पद्धत याबाबत बरीच माहिती मिळाली.
चितमपल्ली सांगत होते की होकर्णे, तुमच्या कॅमेर्यातून दिसणारे पक्षी मोजकेच परंतु याच झाडावर जरा कॅमेरा बाजूला ठेवून बघा, आत शेकडो पक्षी आहेत आणि जे पक्षी स्पष्ट टिपण्यासारखे आहेत ते झाडाच्या चोहोबाजूनी बसलेले आहेत. कारण ते या पक्षांच्या सुरक्षेसाठी असे बसलेले आहेत, जणू कोतवालाच्या भूमिकेत आहेत. (हरणेही माळरानावर अशीच चार दिशांना तोंडे करून बसलेली असतात.) हा अनुभव त्यांच्याकडून समजावून घेताना खरच यावेळी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
चितमपल्ली सरांचा हा सहवास यालाच तर परिसस्पर्श म्हणतात याचीही जाणीव याच वेळी झाली. चितमपल्ली यांनी सांगितलेली आणखी एक आठवण:
हा पक्षी शिकार्यांना फार आवडतो. पण ह्या पक्षालाही शिकाराची जाणीव तत्काळ होते, शिकार होताना बाणाचा घाव लागणार असे लक्षात येताच हा पक्षी स्वतःच्या शरीरात असे बदल घडवून आणतो की त्याच्या शरिराचे विषात रूपांतर होते. मग जर शिकार्यांनी या पक्षाचे भक्षण केले तर त्याना तत्काळ मरणाला सामोरे जावे लागते. म्हणून अनुभवी शिकारी कधी त्याच्या शिकारीच्या भानगडीत पडत नाहीत… (अर्थात पक्ष्यांची शिकार होऊ नये यासाठी अशा अनेक कथा रचण्यात आल्या आहेत.)
-विजय होकर्णे, नांदेड
(लेखक पक्षीमित्र व छायाचित्रकार आहेत.)
ईमेल: vvhokarne@gmail.com
संपर्क: 9422162022
होकर्णे खूप दिवसांनी दिसले.