# मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईल मध्ये परस्पर फेरफार.

सा.बां. विभागाच्या अधीक्षक अभियंत्याच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश फिरवण्यात आल्याचा प्रकार उघड

मुंबईः मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केलेल्या एका महत्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करून एका अधीक्षक अभियंत्याच्या खातेनिहाय चौकशीचा आदेशच फिरवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर स्वाक्षरीच्या वर लाल शाईच्या पेनने ही चौकशी बंद करण्यात यावी, असे लिहिण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप- शिवसेना युतीचे सरकार असताना जेजे स्कूल ऑफ आर्टच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनेक अभियंत्यांच्या चौकशीची शिफारस करण्यात आली होती. त्यात तेव्हा कार्यकारी अभियंता असलेले नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे आता अधीक्षक अभियंता आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अभियंत्यांच्या चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी करून ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. जेव्हा या फाईल सार्वजनिक बांधकाम विभागात परत आल्या, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात बदल केल्याचे पाहून चव्हाण यांना धक्काच बसला. अन्य अभियंत्यांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश कायम ठेवून फक्त अधीक्षक अभियंता नाना पवार यांचीच चौकशी थांबण्यात आली होती. अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या खातेनिहाय चौकशीच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीच्या वर लाल शाईच्या पेनने ही चौकशी बंद करण्यात यावी, असा शेरा लिहिण्यात आला.

मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वाक्षरी आणि शेऱ्यामध्ये अतिशय कमी स्पेस पाहून चव्हाण यांना संशय आला. जेव्हा एखाद्या फाईलवर शेरा मारून स्वाक्षरी केली जाते तेव्हा शेरा आणि स्वाक्षरीमध्ये पुरेसे अंतर असते. मात्र, तसे या प्रकरणात दिसले नाही.

पडताळणी करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठवली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयात त्यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रत्येक फाईलची प्रत स्कॅन करून ठेवली जाते. मुख्यमंत्री कार्यालयात त्या फाईलवर असा कोणताही शेरा नसल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी कोणताही शेरा न मारता खातेनिहाय चौकशीला मंजुरी दिली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर फाईलमध्ये परस्पर फेरफार करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मंत्रालयाच्या इतिहासात असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नसल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. अधिकाऱ्यांनी फाईलवर मारलेल्या शेऱ्यात फेरफार केल्याचे काही प्रकार यापूर्वी घडले होते. मात्र, थेट मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर आदेशात फेरफार केल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ही अंतिम शब्द असतो. आता तो अंतिम शब्दच फिरवण्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *