औरंगाबाद: ‘शब्दात लय नसेल तर गाणं अशक्य आहे आणि ती ठरल्यावर संगीतकार तिला बदलू शकत नाही. लयीला विशिष्ट तर्क असतो. चालीचा तर्क लागल्यावर ती स्वतःला आपोआप रचत जाते. लय ही गाण्याचे प्राणतत्व आहे.’ असे उद्गार प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले.
मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती व सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमात ‘कवितेचं गाणं होताना’ या विषयावर ऑनलाईन ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते तर विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य व समन्वयक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.
कौशल इनामदार पुढे म्हणाले की, संगीतकार आधी कविता घेतो मग तिला चाल लावतो. कवितेला चाल देताना, शब्दच हवे असतात, कारण कवितेची चाल ही त्या शब्दात दडलेली असते. कवितेत सूचक शब्द असतात त्या ध्वनीमधून संगीतकार ध्वनीसूचक शब्द अधोरेखित करत असतो. छंदबद्ध कवितेची जशी एक स्वत:ची लय असते, तशीच मुक्तछंदातील काही कवितांमध्येदेखील लय असते. ती लय संगीतकाराला सापडली की त्या कवितेचं गाणं होतं. पण याचा अर्थ असाही नाही की संगीतकार हा काही कवीची कुरिअर सेवा देणारा असतो की जो कविता रसिकांपर्यंत पोहोचवतो. पण संगीतकार मात्र कविचा आणि कवितेचा रसिक असतो आणि तो त्याचं रसिकत्व गाण्यातून मांडत असतो. कविता वाचताना वाचक फक्त डोळे वापरतो. पण संगीत इतर इंद्रियांनाही आवाहन करते. तसेच बोलण्यापेक्षा ऐकण्याची कला ही श्रेष्ठ आहे. मैफलीचंदेखील तसंच आहे. चांगला ऐकणारा असेल तरच मैफल रंगते. कारण श्रोता हा मैफलीस, कवितेस पूर्णत्व देत असतो, असेही ते म्हणाले.
कौशल इनामदार यांनी बोलताना कवी कुसुमाग्रज, मर्ढेकर, ग्रेस व नारायण सुर्वे यांच्या कवितेचं गाणं कसं झालं याचेेदेखील सांगितिक सादरीकरण केले.
मराठी साहित्य सातासमुद्रापार -कुलगुरू येवले: अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की, संत साहित्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. संतांचे साहित्य सातासमुद्रापार गेलेले आहे. शाहिरांनी लावणी व पोवाडे लिहून इतिहास जिवंत ठेवलाय. अगदी प्रारंभापासूनच मराठी भाषेला अस्तित्वासाठी झगडावे लागलेले आहे. परंतु अनेक साहित्यिक, कवी, समीक्षक, रसिक व मराठीजनांनी तिचे तेज तेवत ठेवले आहे. परंतु दुर्देवाने आपल्याकडील भाषिक ऐवज असणाऱ्या बोलींचा साहित्य व व्यवहारात पुरेपूर अवलंब झाला नाही. या भाषा खेडेपाडे, वाड्या, वस्त्या व पाड्यांवर टिकून राहिल्या. अलीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व इंग्रजीच्या दुराग्रहामुळे मराठी भाषेची दूरवस्था झाली आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील मराठीचा झेंडा मागे आहे. तो वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.दासू वैद्य यांनी केले व तर सूत्रसंचालन व आभार डॉ.कैलास अंभुरे यांनी मानले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.राजेश करपे, प्रा.फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य प्रा.स्मीता अवचार, प्रा.मुंजा धोंडगे, प्रा.मुस्तजीब खान यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व रसिकांची झूमसह फेसबूकवर मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचा दहा हजार पेक्षा अधिक रसिकांनी आस्वाद घेतला.