अंबाजोगाई: माझे आवडते गझलकार, चांगले मित्र इलाही जमादार यांच्या दुःखद निधनाची बातमी धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तबेत ठीक नव्हती. कोरोनामुळे अलीकडे पुण्याला जाणे झाले नाही. गेल्या मार्च महिन्यात 4 तारखेला त्यांना शेवटचा भेटलो.
निखळ मित्र व उत्तम गझलकार. त्यांना अनेक वेळा अंबाजोगाईला बोलावले. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, मसाप शाखा अंबाजोगाईच्या कवी संमेलनात ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा सहवास लाभला. पुण्यात गेलो की हमखास त्यांना कदम वाड्यात जाऊन भेटणे हा शिरस्ताच होता. त्यांना भेटलो की खूप आनंद व्हायचा. वेळ काढून भेटतो. त्यांची ख्याती खुशाली घेत राहिलो. ते विचाराने व मनाने विशाल व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या जाण्याने गझल क्षेत्र व मित्रांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. व्यक्तिगत माझे प्रेमळ मित्र गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आयुष्य भर सुगंधी जखम घेऊन दरवळत राहणारे इलाही आज आपल्यात नाहीत ही खूप वेदनादायी घटना आहे, अशी सहवेदना इलाही जमादार यांचे चाहते कवी व सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांनी व्यक्त केली आहे.