# निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींचे 12 मार्चला मतदान.

मुंबई: विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री.मदान यांनी सांगितले की, उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.2 मधील निवडणूक नि:पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी 24 फेब्रुवारी रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 12 मार्च रोजी होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *