इलाही जात, धर्म, पंथ याच्या पलीकडचे निर्मळ जीवन जगत होते. माणूस आणि माणुसकी एवढेच भांडवल त्यांच्या जगण्यासाठी भरपूर होते. आयुष्यभर व्यथा, वेदना, प्रश्न घेऊन लिहिणारा कवी आज आपल्या व्यथा आणि प्रश्न सोडून आपल्यातून निघून गेला. अशा या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार इलाही जमादार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांच्यावर निस्सीम पणे प्रेम करणारे त्यांचे मित्र व स्नेही कवी दगडू लोमटे यांनी…
सन १९९० च्या आसपास भीमराव पांचाळे यांची ध्वनिफीत (कॅसेट) हाती पडली. भावनांची वादळे, एक जखम सुगंधी. मराठी गझलेला स्वरांचा नवा साज देणारे भीमराव पांचाळे यांची माझी अशी ही अप्रत्यक्ष ओळख. या कॅसेट मध्ये अनेक उत्तम गझलकार यांच्या गझला भीमरावांनी गायला आहेत. त्यात मराठी गझलेचा बाप माणूस सुरेश भट यांच्या सह उ.रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, संगीता जोशी, ए.के. शेख, दिलीप पांढरपट्टे, नीता भिसे, मनोहर रणपिसे, अविनाश सांगोलेकर असे अनेक गझलकार त्यात होते. त्यात प्रामुख्याने इलाही जमादार यांच्या गझला मात्र अधिक प्रभावी, काळजाला हात घालणाऱ्या, दुःखाला फुंकर घालणाऱ्या, विरहाच्या आर्ततेत रुतून बसलेल्या, भावनांचा कल्लोळ, वादळ, कोलाहल आणि डोळ्यात अंजन घालत डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या होत्या. अनेक शेर थेट काळजात भिडत आणि मस्तकात विचारांचा अनेक लकेरी तयार होत असत. त्यामुळे इलाही जमादार कायम हृदयात बसले होते. पुढे भीमराव पांचाळे व इलाही जमादार यांची मैत्री होईल, भेट होईल हे तेंव्हा स्वप्नातही नव्हते. भीमराव पांचाळे यांचे नवे नवे अल्बम वा कॅसेट मिळविणे आणि ऐकत राहणे हे नित्य चालू झाले होते. त्यांची गायकी ही मराठी गझलेला वेगळ्या वळणावर येऊन स्थिर झाली होती. इलाही यांची गझलेची पुस्तके माझ्या संग्रहात यायला लागली. अनेक पारायणे केली. उत्तुंग शेर आणि गझला. मन प्रसन्न होत असे. सुरेश भट यांच्या नंतर गझलेचे काय? असा प्रश्न पडलेल्याना इलाही जमादार यांच्या उत्तम गझला हे मोठं सामर्थ्यशाली उत्तर होतं.
पुढे भीमरावजींच्या अवीट गायकीने मराठी गझल पुढे जात राहिली, गझल संमेलने होऊ लागली. गझलकार एकत्र येऊ लागले. मराठी गझल सशक्त ताकदीने पुढे जाऊ लागली आणि आता नवी पिढी तर लाजवाब लिहू लागली आहे. भटांच्या नंतर आज मराठी गझल एका परमोच्च शिखरावर आहे. मराठी गझल सशक्त करण्यात व पुढे नेण्यात अत्यंत महत्वाचा घटक इलाही जमादार आहेत.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..
असे लिहिणारे इलाही पुढे
चौदा वर्षे पती विना राहिली उर्मिला
हाच खरा वनवास म्हणालो चुकले का हो?
असा खडा सवाल ही विचारतात. किंवा
मी लिहिल्या कविता, लिहिल्या गझला, लिहिली गीते
सरस्वतीचा दास म्हणालो, चुकले का हो?
अशी भावनिक साद ते घालतात. प्रचंड व्यासंग, अभ्यास, आणि चिंतन यातून त्यांचे लिहिणे हे तेजस्वी व प्रखर होत गेले. जात, धर्म, वर्ग यापुढे जाऊन ते लिहीत राहिले.
नित्य नियमाने माणूस कसा बदलत जातोय याच वर्णन त्यांनी अस केलं आहे
रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे..
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा..
एवढं बारीक निरीक्षण लिहिणारे ते कवी होते, गझलकार होते. पुढे औरंगाबाद ला भीमराव पांचाळे यांनी गझल संमेलन घेतले, त्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मी त्यांना व भीमरावांना प्रथम तिथे भेटलो. जुजबी ओळख झाली. त्यानंतर वाईच्या गझल संमेलनात परत भेटी झाल्या आणि मग दोघांचा परिचय घट्ट होत गेला. स्व. विमालताई मुंदडा राज्याच्या आरोग्यमंत्री असताना त्यांनी अंबाजोगाईला भीमराव पांचाळे यांचा गझल गायनाचा कार्यक्रम मुकुंदराज सभागृहात आयोजित केला होता. भीमराव पांचाळे यांना प्रथमच प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले. उत्तम मैफल झाली. निवेदनला शाहीर सुरेशकुमार वैराळकर व दत्ता बाळसराफ होते. सुरेख व खुमासदार निवेदन आणि भीमरावजी यांची संगीत मैफिल आजही आठवते. त्या मैफिलीत इलाही जमादार यांच्याच जास्त गझल गायल्या गेल्या. एक ओळ उर्दू आणि दुसरी ओळ मराठी अशी पहिली गझल त्यांनीच लिहिली. ती गझल भीमराव यांनी उत्तम गायली.
ऐ सनम आँखों को मेरी खूबसुरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे..
इलाही मात्रा, लय फारच काळजी पूर्वक करायचे. आणि त्यांचे गझल सादरीकरणही अत्यंत लयीत असायचे. नवखा माणूसही लय पकडत असे. सादरीकरण तन्मयतेने करत असत. अधिक अधिक वृते वापरणारे अनोखे गझलकार इलाही. पुढे लातूरला त्यांच्या गझल वाचनाचे कार्यक्रम झाले, अंबाजोगाईला यशवंतताव चव्हाण स्मृती समारोहात कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून आले, अंबाजोगाई मसाप शाखा साहित्य महोत्सवाचे ते उद्घाटक होते. अंबाजोगाई त्यांना खूप आवडतं असे. दोन तीन दिवस ते राहायचे. परिसरात फिरायचे. खूप उत्साही. नंतर ते खूप जिवलग मित्र कधी झाले ते कळलेच नाही. मला दगडूशेठ म्हणणारे ते पहिले होते. नंतर पुण्यात कदम वाड्यात जाणे येणे, सतत भेटणे सुरू झाले. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा खरा परिचय होत गेला. माणूस म्हणून त्यांचे जगणे कळू लागले. व्यथा, वेदना उशाशी घेऊन झोपणारा हा अवलिया. जेवढा लिहिण्यात उंचीचे दिसायचे तेवढे आपली कामे स्वतः करून जगण्याचा आनंद ते शोधत राहायचे. मित्रांचे फोन त्यांनी कधी टाळले नाही. सतत सगळ्यांशी बोलत आपली नवी प्रतिभा ते गझल रूपाने ऐकवायचे. गेली वीस वर्ष त्यांच्या पुण्यातला कदम वाड्यात त्यांना भेटण्याचा योग सतत येत गेला. ख्याली खुशाली एकमेकांना विचारत गेलो. घरी ते एकटे असत. त्यांच्या हातचा चहा व त्याची चव शब्दातीत. त्यांनी कधीच हॉटेल मध्ये चहा घ्यायला नेले नाही हा त्यांचा मोठेपणा. त्यांना भेटण्यास गेलो की पहिली त्यांची आवडती सात आठ मांजरे व त्यांची पिल्ले स्वागत करत आणि इलाही त्यांना बोलत असत. ती मांजरे त्यांचं ऐकत असत. स्वतःला कमी पण मांजराला भरपूर दूध, खाद्य खायला द्यायचे आणि मांजरे खूपच देखणी असायची. इलाही यांच्या शब्दापलीकडे ती कधी गेली नसावीत.
पत्नीच्या निधनाने खचलेले इलाही रोजच्या जगाण्यात व्यतीथ होत असत. पण त्याची जाणीव दुसऱ्याला होऊ देत नसत. एकाकी जगणं काय असत त्यांच्याकडे पाहिलं की कळतं. एकिकडे एकटे पणा आणि दुसरीकडे भावुक क्षणांचा गझलेत ओलावा. अंतर मनात होत असलेली घुसमट आणि भावनांची वादळे आयुष्यभर झेलणारा हा माणूस. त्यांचावर अंतःकरणातून खूप प्रेम करणारा मित्र वर्ग त्यांनी जोपासला, सांभाळला, टिकवला. नांदेडला प्रा.विकास कदम यांनी मोठा सत्कार समारंभ ठेवला होता. सभागृह खचाखच भरलेले. मी खास त्यासाठी गेलो होतो. अपार आनंद त्यांना झाला होता. दोह्यांचे अप्रतिम निर्माण त्यांनी केले. अखंड हजारो दोहे त्यांनी लिहिले. प्रा. कदम यांनी ते प्रकाशित केले आणि शेवटी त्यांच्या हयातीत ते प्रकाशित केले.
पुरस्कारांनी त्यांचे घर गच्च भरलेले होते. गेलो की नवीन कांही तरी खबरबात असायचीच.
गेल्या वर्षी १ मार्चला मला संगीत सेवे साठी स्व. पं. अण्णासाहेब गुंजकर स्मृती पुरस्कार पुण्यात देण्यात आला. त्या वेळी त्यांना भेटलो. त्यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. पण मी ३ मार्चला कदम वाड्यात भेटायला गेलो. अत्यंत क्षीण आवाज आणि प्रचंड थकवा मला त्यांच्यात जाणवला. अशाही स्थितीत ते बोलत राहिले. नवे दोहे आणि नवी एक गझल त्यांनी मला ऐकवली आणि ते मध्ये दोनवेळा कॉट वर आडवे झाले. इतके थकलेले मी कधीच पाहिले नव्हते. त्यांच्या उशाला ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो टांगलेला होता. माउली विषयी त्यांना अपार श्रद्धा व प्रेम होते. इलाही जात, धर्म, पंथ याच्या पलीकडचे निर्मळ जीवन जगत होते. माणूस आणि माणुसकी एवढेच भांडवल त्यांच्या जगण्यासाठी भरपूर होते. या भेटीत त्यांच्या तबेतीची काळजी वाटली. मी त्यांना तसे म्हणालोही. पण त्यांच्या नजरेत मला खिन्नता जाणवली. गप्पात एक दिवस अचानक फोन करून संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर घरी आल्याचे सांगितले. त्यांच्या मुलीला दोन गझला फार आवडल्या आणि त्याला तिने चाल लावली आहे ते ऐकवण्यासाठी ते आले होते. आणि नंतर दीनानाथ हॉस्पिटल मध्ये उपचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला असे म्हणाले. एवढा मान मिळविणे कलावंतासाठी मोठी गोष्ठ असते. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सबंध वर्ष पुण्याला जाता आले नाही. पुण्यातून परतल्यास एक फोन मी कांही दिवसांनी केला. तेंव्हा त्यांचा आवाजही नीट बाहेर पडत नाही हे लक्षात आले. मी फारच खिन्न व खजील झालो. त्यांच्या मृत्यूची बातमी धडकली आणि कांही समजेना. कोणाला फोन करावा सुचेना. सहा महिण्यात त्यांचा कसलाच संपर्क राहिला नाही. चौकशी कुणाकडे करणार. त्यांच्या शिवाय. मी उदास झालो. हतबल झालो.
आयुष्यभर व्यथा, वेदना, प्रश्न घेऊन लिहिणारा कवी आज आपल्या व्यथा आणि प्रश्न सोडून आपल्यातून निघून गेला. भेटीत अनेक किस्से, मित्रांचे संदर्भ येत. नवे ऐकण्यात येत असे पण आता भेटही नाही. होणार पण नाही. निःस्वार्थ मित्र निर्व्याज वेदना देऊन जगातून निघून गेला.
ह्या क्षितिजाच्या पल्याड निघूनी जावे म्हणतो
आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो..
जन्म आहे मरण टाळता येत नाही. नाशवंत देह. आकाशाला टाळता आले नाही आणि क्षितीजाच्या पल्याड अखेर जावे लागते. इलाही तसे गेले. त्यांची कविता, गझल, गीते आणि दोहे माझ्या आणि कुणाच्याच नजरे आड कधीच जाऊ शकत नाहीत. अलविदा मित्रवर्य इलाही…
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
9823009512