नवी दिल्ली: पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली.
दौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी
पुणे-मुंबई प्रगती (१२१२६ / १२१२५) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणीही सुळे यांनी केली. पुणे – सिकंदराबाद, चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर , संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
नीरा, पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे अशी सुचना केली. नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी मांडली.
जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक २५ येथे भुयारी मार्ग बांधावा अशी मागणीही यावेळी केली. याशिवाय सुकलवाडी येथे रेल्वे पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सुचनाही केली. जेजुरी स्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरु करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करण्यात यावेत अशीही मागणी यावेळी केली. ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी स्थानक दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे आणि कोळविहिरे येथे उड्डाणपूल बांधावा या मागण्या यावेळी मांडल्या. चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये, भिगवण परिसरातील नागरीकांना हे स्टेशन अतिशय सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सहजपूर, कासुर्डी येथे रेल्वेला थांबा मिळावा: रोजच्या रोज दौंडहून पुणे आणि पुण्याहून पुन्हा दौंड असा रेल्वे प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कामगार, पोलीस, शेतकरी, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी इतकेच नाही तर अन्य अनेक कारणांनी प्रवास करणारे, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. सहजपुरपासून उरुळी कांचन रेल्वे स्टेशन साधारण आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असून ते अंतर प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने सहजपूर आणि कासुर्डी येथे रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पियुष गोयल यांच्या लक्षात आणून दिले.