पालकमंत्री धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
बीड: गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून, या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फ़त तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला. या पावसाच्या तडाख्याने काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजी-पाला पिके यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध महसूल मंडळामधून प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांकडूनही आपण याबाबत फोनवरून माहिती मागवली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून याचा अहवाल राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत दिले आहेत.