गुन्हेगारीच्या सापळ्यात अडकलेल्या मुलांचं जगणं उलगडून दाखवणारं ‘पहिला नंबरकारी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नुकतंच वाचकांच्या हाती सोपवलं आहे. त्यानिमित्ताने विधिसंघर्षग्रस्त मुलांचा प्रश्न आणि त्यावरील या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका समजून घेण्यासाठी पुस्तकाच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमिता नायडू यांच्याशी मनोविकास प्रकाशनाचे संपादक विलास पाटील यांनी साधलेला हा संवाद खास आपल्यासाठी…
•या पुस्तकाच्या लेखनामागची प्रेरणा आणि गरज काय होती?
अमिता नायडू- माझं पहिलं पुस्तक ‘प्लॅटफॉर्म नं झीरो’ आणि आता हे दुसरं पुस्तकही मुलांसाठी मी केलेल्या माझ्या कामातून निर्माण झालेलं आहे. ही पुस्तकं लिहायची म्हणून मी वेगवेगळ्या परिस्थितीत जगणाऱ्या मुलांसाठी काम केलं नाही तर त्यांच्यासाठी काम करत असताना आणि केल्यानंतर त्यांचं लिखाण ही माझ्यासाठी कुठेतरी अपरिहार्य बाब ठरली म्हणून ही पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यामुळे प्रेरणेचा विचार केला तर ती पुस्तकासाठी नाही तर मुळातच अशा मुलांसाठी मला काम करावंसं का वाटत गेलं त्याबद्दल बोलायला लागेल. हे बोलताना खूप मागे भूतकाळात जावं लागेल. माझ्या लहानपणी पुण्याच्या ज्या भागातल्या सरकारी क्वार्टर्स असलेल्या एका कॉलनीत आम्ही राहत होतो तो भाग बऱ्यापैकी बंदिस्त आणि आजूबाजूला उच्चभ्रू वस्ती असलेला होता, ज्या शाळेत जात होते तीही मोठी आणि आजूबाजूची राहती वस्ती शांत असलेली अशी होती. ही दोन्ही ठिकाणं अशी होती की जिथं अभावग्रस्त मुलं बघायला मिळणं एरवी अवघड होतं पण तरीही जवळपास रोज अशी मुलं बघायला मिळायची कारण शाळेच्या येण्याजाण्याच्या वाटेवर त्या परिसरातल्या दोन मोठ्या वस्त्या होत्या आणि काही ना काही कारणांनी रस्त्यावर ही मुलं सतत येत असायची. रोज नजरेला पडणारी ही मुलं इतकी सवयीची झाली होती की त्यात काही वेगळं वाटेनासं झालं होतं. जणू असं काही असतं हे आम्ही गृहीत धरल्यासारखं झालं होतं. माझ्या संवेदनांना तोवर तरी कोणतीही जाग आलेली नव्हती. या मुलांबद्दल वेगळं काही वाटायला लावणारा जो ट्रिगर पॉईंट किंवा प्रसंग घडला तो जेव्हा मी स्वतः माझ्या टीन एज किंवा किशोरावस्थेत होते तेव्हा! एका पावसाळी दुपारी जेव्हा छान अंधारून आलं आणि वारं सुटलं तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी कॉलनीच्या सगळ्या बिल्डिंग्ज ओलांडून मुख्य रस्त्यावरून मी फिरायला बाहेर पडले होते. काही वेळच फिरायला मिळालं आणि जोराचा पाऊस सुरु झाला, तो एवढा मोठा होता की आनंद रद्द करून घरी परत येण्यासाठी मी मागे फिरले. त्या पावसाने बहुतेकांची त्रेधा उडवल्याने लोक आपापल्या वाहनांवरून रस्त्यावरून वेगानं जायला लागले. या गडबडीत एका दुचाकीवाल्याचा माझ्या खूप पुढं चालणाऱ्या एका छोट्या मुलीला निसटता धक्का लागला आणि तिच्या डोक्यावरची मोठी पिशवी खाली पडली आणि आतले कांदे, बटाटे, टमाटे आणि अजून काही भाजी रस्त्यावर इकडे तिकडे पसरली. मुलगी रडकुंडीला येऊन पसरलेली भाजी गोळा करायला लागली पण पाऊस आणि वेगानं जाणाऱ्या वाहनांमुळे तिला ते शक्य होईना. चालत जाणारे लोकंही तिला ओलांडून, तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जात होते. मुलगी भर पावसात भिजत आणि रडत उभी होती. मी जसजशी तिच्या जवळ जायला लागले तसतसं तिच्याकडे, तिच्या कपड्यांकडे, पिशवीकडे बघितल्यावर मला समजलं की ती आमच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या वस्तीतलीच असणार आहे. इतरांसारखीच मीही तिला टाळून काही पावलं पुढे गेले. अचानक एका क्षणात काय झालं ते मला आजतागायत समजलं नाही. पुढे गेलेली मी मागे आले आणि तिच्या जवळ जाऊन तिची रस्त्यावर पसरलेली भाजी गोळा करून तिच्या पिशवीत भरायला लागले.
मला तसं करताना बघितल्यावर मुलगी धावत माझ्या जवळ आली आणि आम्ही दोघींनी मिळून ती भाजी पिशवीत भरली. बहुतेक भाजी खराब आणि सडलेली होती पण तिच्यासाठी ती महत्त्वाची होती कारण जवळच असलेल्या मार्केटयार्डमध्ये जाऊन फेकून दिलेली ती भाजी आणण्याचं काम तिच्या घरातल्यांनी त्या कोवळ्या आठ– नऊ वर्षाच्या मुलीला दिलं होतं. आठ का नऊ भावंडं असलेल्या त्या घरातली ही मुलगी तीन नंबरची होती आणि तिच्या घरातले आई वडील, दोन मोठी भावंडं, आजी असे सगळेच दिवसभर कुठे ना कुठे कामाला जात होते. या मुलीनं गोळा करून आणलेल्या भाजीवर त्या कुटुंबाचे तीन चार दिवस तरी निघत होते. त्या पावसाळी दुपारी ती पिशवी घेऊन तिला तिच्या वस्तीपर्यंत पोचवायला गेलेली मी त्यानंतर अशा मुलांच्या जगण्यापाशी थांबले ते अगदी आजपर्यंत. त्यामुळे याला प्रेरणा म्हणायचं की काय ते मला माहीत नाही पण अभावग्रस्त आणि वंचित मुलांचा वेगळा विचार करायला प्रवृत्त करणारा हा ट्रिगर होता हे नक्की! यानंतर जशी जशी संधी मिळत गेली तसतसं वेगवेगळ्या परिस्थितीत जगणाऱ्या मुलांसाठी काम करत गेले. विधीसंघर्षग्रस्त मुलांसाठी काम करावंसं का वाटलं, हे मी पुस्तकाच्या मनोगतात सविस्तरपणे लिहिलं आहेच. या सर्व कामातल्या अनुभवांवर मला लिहीतं करण्याचं काम खरंतर माझ्या प्रकाशक मित्रांनीच केलं. लोकांनी अशा मुलांचं जगणं समजून घ्यावं आणि त्यांना विकासाच्या, मुख्य प्रवाहात येण्याच्या संधी मिळाव्यात हा विचार यामागे होता.
•विधीसंघर्षग्रस्त मुलांचा नेमका प्रश्न आणि त्याचं स्वरूप काय आहे?
अमिता नायडू- फक्त विधीसंघर्षग्रस्तच नाही तर एकूणच सगळ्या अभावग्रस्त मुलांचा नेमका प्रश्न आणि त्याचं स्वरूप असं स्पष्टपणे सांगता येणार नाही कारण अनेक प्रश्नांच्या आणि परिस्थितीच्या गुंतागुंतीमधून या मुलांचं जगणं तयार झालेलं असतं. मूळ कारण अर्थातच आपल्या अनेक पदरी सामाजिक व्यवस्थेत असलेल्या अशा काही गोष्टी, ज्यांना बदलत्या काळानुसार न बदलवणं हे आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या बाबतीत काही मुख्य प्रश्न आहेत ते गरिबी, घरात शिक्षणाची परंपराच नसणे, कुटुंबात मायेचा, प्रेमाचा अभाव, जात-धर्मावर आधारलेलं शोषण, आसपासच्या वातावरणात फोफावलेली सर्व प्रकारची गुन्हेगारी, त्याचं एक प्रकारे झालेलं मायावी वलयीकरण, शहरात निर्माण झालेले मोहाचे विविध भुलभुलैय्ये आणि विकासाच्या संधी उपलब्ध नसणे. या प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल विचार करताना पुन्हा आपण येतो ते मुलांबद्दल आपण काय आणि कसा विचार करत असतो या मानसिकतेपाशी!एका कुटुंबात एखादं मूल जन्माला येणं आणि त्यानं समाजाचा एक जबाबदार भाग बनणं, ही प्रक्रिया आपल्या सर्वांना एकूणच मुलांच्या बाबतीत अपेक्षित असेल तर या प्रवासात त्या मुलाच्या कुटुंबांइतकीच समाजातल्या प्रत्येक घटकाची एक विशिष्ट भूमिका आहे, एक जबाबदारी आहे, हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून गेलो आहोत. कोणतंही मूल पहिल्यांदा कुटुंबात, नंतर त्याच्या परिसरात आणि सरतेशेवटी समाजात वाढत असतं. या तीनही ठिकाणी त्याच्या समोर असे प्रश्न उभे राहत असतील की त्यावर उत्तरं शोधण्यासाठी त्याला योग्य रस्ते, योग्य मार्गदर्शन करणारे मिळत नसतील आणि शेवटी नाईलाजाने तो कोणत्यातरी विघातक वृत्तीच्या ताब्यात जात असेल तर या मुलांच्या प्रश्नाचं स्वरूप आपण काय करून ठेवलं आहे, याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केलेला बरा.
•या मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? या चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा किती मुलांची असते? पालकांचा त्यासाठी किती प्रयत्न असतो?
अमिता नायडू- पुन्हा एकदा मी म्हणेन की फक्त विधीसंघर्षग्रस्तच नाही तर एकूणच सगळ्या अभावग्रस्त मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव हा आपल्यालाच काहीतरी शिकवणारा, शहाणं करून सोडणारा असतो. खूप लहान वयात कधी मुलभूत गोष्टींसाठी, कधी अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागलेला असतो त्यानं लहान वयातच या मुलांची आयुष्याबद्दलची, नातेसंबंधाबद्दलची समज खूप वाढवलेली असते. एखाद्याला आपलं मानलं, त्याच्याशी नातं तयार झालं की मग त्या माणसासाठी मुलं काहीही करायला तयार असतात. मला स्वतःलाही या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, जो मी पुस्तकात लिहिला आहेच. अर्थात या गोष्टीचा फायदा काही गुंड, विघातक प्रवृत्ती घेत असतातच. त्यामुळे म्हणूनच अशा मुलांसाठी सकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांनी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता पुढे येण्याची खूप गरज आहे.
विधीसंघर्षग्रस्त मुलांबरोबर काम करत असताना जाणवलं ते हे की यांना काहीतरी शिकवायचं असा आव आणून जी, जी लोकं या मुलांशी बोलायला जात होती किंवा तुम्ही गुन्हेगार आहात अशी जाणीव करून देणारी जी लोकं होती त्या सगळ्यांना या मुलांनी फार टिकू दिलं नव्हतं. बाहेरून येणारी जी लोकं कधी स्पष्टपणे तर कधी आडून यांच्यावर निरनिराळे शिक्के मारायला यायची त्या सगळ्यांची त्यांनी आपल्या पद्धतीनं टर उडवली होती. त्यांनी फक्त अशाच लोकांना आपल्यापर्यंत पोहोचू दिलं होतं, ज्यांनी त्यांना ते जसं आहेत तसं आणि त्यांच्या ऑफेन्ससह स्वीकारलं होतं. फक्त एवढंच नाही तर निरीक्षणगृहात आल्यानंतरही त्यांनी त्यांच्या पातळीवर ज्या काही व्यवस्था निर्माण केल्या होत्या त्यात देखील बाहेरून आलेल्या लोकांनी ढवळाढवळ केलेली त्यांना चालायची नाही. मला स्वतःला देखील त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार खूप दिवसांनी मिळाला होता. आपापल्या डॉर्मेट्रीजमध्ये त्यांनी बाहेरच्या समाजातल्यासारखीच एक समांतर वर्ण आणि न्याय व्यवस्था निर्माण केली होती. या वर्ण व्यवस्थेत ३०२ म्हणजे खुनाचा ऑफेन्स असलेला सर्वश्रेष्ठ होता. त्याची पोटशाखा ३०७ म्हणजे हाफ मर्डर होती. त्या खालोखाल जमिनी बळकावणे, वाळू चोरी, धमकी, हफ्ता वसुली, खंडणी मागणे, किंवा त्यासाठी किडनॅपिंग करणारे होते. त्यानंतर घरफोडी, लुटालूट, वाटमारी, गाड्या चोरणे इ. होते. शुद्र वर्ण म्हणजे किरकोळ चोरी करणारे आणि शूद्रातिशूद्र म्हणजे बलात्कार करणारे. शुद्र आणि शुद्रातीशुद्रांना त्यांच्या समांतर न्यायव्यवस्थेत शिक्षा केली जात असे. ही शिक्षा बहुतेक वेळा ३०२ वाले ठोठावत आणि बाकीचे सगळे ते निमूटपणे ऐकत. एकदा त्यावरून मी त्यांची खरमरीत हजेरी जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी मला उलट एकही अपशब्द वापरला नाही तो आमच्यातल्या याच दृढ नातेसंबंधामुळे! असं जरी असलं तरी बहुतेक सर्वच विधीसंघर्षग्रस्त मुलांना आणि त्यांच्या पालकांना या सगळ्या धोकादायक चक्रातून बाहेर पडून सामान्य आयुष्य जगण्याची तीव्र इच्छा असते आणि त्यासाठी मुलं आणि पालकांना जीवाचा आटापिटा करताना, प्रसंगी राहती घरदार विकून किंवा सोडून आडगावी विस्थापित होताना मी बघितलं आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक ती साधनं, मार्गदर्शन आणि समाजाचा, यंत्रणेचा पाठींबा त्यांना मिळत नाही हे देखील यातलं दुर्दैवी सत्य आहे.
•पहिला नंबरकारी या नावाचा काय अर्थ आहे?
अमिता नायडू- पहिला नंबरकारी म्हणजे पोलिसी भाषेत मुख्य आरोपी! जेव्हा एखाद्या गुन्ह्यात एका पेक्षा जास्त संशयित किंवा आरोपी असतील तर त्यांना ‘नंबरकारी’ असं संबोधलं जातं. म्हणजे गुन्ह्यातले एकमेकांचे साथीदार. गुन्ह्यात कोणाचा किती सहभाग आहे यावरून तपास अधिकाऱ्यांकडून आरोपींची प्रतवारी ठरवली जाते. त्यामुळे आरोपपत्र तयार करताना त्यात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा… नंबरकारी असा उल्लेख असतो. थोडक्यात आरोपींना पोलिसी आणि कोर्टाच्या भाषेत ‘नंबरकारी’ असं म्हटलं जातं.
•मुलांचा गुन्ह्यांसाठी होणारा वापर कसा रोखला जाऊ शकतो? आज कायद्याच्या व यंत्रणेच्या पातळीवर काय स्थिती आहे?
अमिता नायडू- या प्रश्नाचं उत्तर अर्थातच जी मुलं विघातक वृत्तींना बळी पडतात त्यांच्या भवतालात सकारात्मक बदल घडवणे, त्यांना आणि त्यांच्या पालकांना सुरक्षित जगण्याच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हेच आहे. मूल कोणतंही असो, कोणत्याही परिस्थितीतलं, जाती धर्मातलं, शहरी- ग्रामीण असो, त्याची वाढण्याची पहिली जागा त्याचं घर आणि त्याचे आई– वडील ही असते. मुलांना जगण्याची सुरक्षितता आणि विकासाची संधी या पहिल्या जागीच मिळणं गरजेचं असतं. हा पाया मजबूत बनला तरंच त्यांचं पुढचं घडणंही मजबूत होईल. म्हणजेच त्यांच्या पालकांना या बाबतीत सक्षम आणि सजग बनवणं गरजेचं आहे. पालक आर्थिकदृष्ट्या खंबीर असतील, त्यांना स्वतःला विकासाच्या संधी मिळत असतील, त्यांना आजूबाजूच्या जगात काय नवीन बदल होतं आहेत आणि त्याचा आपल्या जगण्यासाठी कसा उपयोग होतोय किंवा होत नाही याची जाण आली तर नक्कीच मुलांना वाढवताना ते वेगळी भूमिका घेतील. मुलांचा जेव्हा गुन्ह्यासाठी वापर केला जातो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं वास्तव अशा गोष्टींना बळी पडण्यासाठी पोषक असतं आणि म्हणूनच अशा मुलांना सहजासहजी गुन्ह्यांसाठी वापरता येऊ शकतं. हे वास्तव बदलवलं तर आपोआप गुन्ह्यासाठी होणारा मुलांचा वापरही रोखला जाईल. मुलांसाठी असलेला ‘बाल अधिनियम कायदा’ किंवा जे. जे. अॅक्ट मध्ये अभावग्रस्त मुलांसाठी वेळोवेळी काही तरतुदी, काही बदल केले गेले आहेत. कधी ते सकारात्मक, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त होते तर कधी लोकांच्या दबावाखाली आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारेही होते. मात्र, एकुणात बघितलं तर कायद्याने त्यांना संरक्षण पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. प्रश्न अनेकदा उद्भवतो अंमलबजावणीच्या पातळीवर त्याचा योग्य वापर केला जात नाही तेव्हा. कायदा पुस्तकात राहतो आणि तरतुदी कागदावर. पोलीस, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला बाल विकास खातं, त्यांच्या अंतर्गत येणारी सरकारी निरीक्षणगृहे, महिला बाल कल्याण मंत्रालय आदी यंत्रणा या मुलांच्या कल्याणासाठी शक्य आहे त्या गोष्टीही करण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचलत नाही. कायद्याच्या बाबतीतलं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी या मुलांसाठी काम करत असतानाच्या काळात अनेकदा पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पूर्ण गणवेशात सर्रास कोर्टात बेड्या घालून आणताना मी बघितलं आहे. याबाबत मुलांचा कायदा म्हणतो की अल्पवयीन मुलांनी केलेल्या ऑफेन्सची चौकशी करताना किंवा त्यांना कोर्टापुढे सादर करताना पोलिसांनी पूर्ण गणवेशात मुलांना कोर्टात बेड्या घालून आणता कामा नये. मात्र, ही गोष्ट पाळली न गेल्याच्या घटनाच जास्त आहेत. याच कायद्यानुसार अल्पवयीन मुलांच्या ऑफेन्सच्या चौकशीसाठी एका खास पोलीस युनिटची व्यवस्था केली गेली आहे, ज्याला पूर्वी JJAPPU जुवेनाईल जस्टीस अॅक्ट पोलीस प्रोटेक्शन युनिट आणि आता SJPU स्पेशल जुवेनाईल पोलीस युनिट म्हटलं जातं आणि खरंतर जे प्रत्येक पोलीस ठाण्यात असायला हवं असं म्हटलं गेलं आहे. ते किती पोलीस ठाण्यात असतं? मी काम करत असताना तर अशा प्रकारचं युनिट मी बघितलं नाही. जे होतं ते फक्त मुख्य पोलीस आयुक्तालयात होतं. कायद्यात सांगितलेलं असूनही जर अशी व्यवस्थाच केली जात नसेल तर याला काय म्हणायचं?
•या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपुढे काय मांडू इच्छिता? समाजाने या अशा मुलांकडे कसं बघितलं पाहिजे?
अमिता नायडू- विधीसंघर्षग्रस्त मुलांकडे बघण्याचा समाजाचा, यंत्रणेचा एकूणच दृष्टीकोन अत्यंत नकारात्मक आहे. ‘ही मुलं गुन्हेगार आहेत, भयानक आहेत, हिंसक आहेत, त्यांच्यामुळे लोकांना धोका आहे, ही मुलं कधीही सुधारणार नाहीत’ ही आणि अशीच धारणा सर्व लोकांची आहे. त्यामुळे या मुलांना कलंकित आणि अतिशय भेदभावाची वागणूक समाजाकडून मिळत असते. एकदा एखादा ऑफेन्स या मुलांकडून घडला की त्या मागची कारण मीमांसा किंवा त्यांची बाजू समजून न घेता सरसकट ‘आता ही मुलं कायम गुन्हेगारीतच राहणार’ अशा प्रकारे त्यांच्यावर शिक्का मारला जातो. त्यांना नंतर सामान्य आयुष्य जगण्याच्या, नोकरीच्या, पुन्हा शिकण्याच्या संधी नाकारल्या जातात. अनेकदा ऑफेन्सचं रूप गंभीर असलं तर मुलांना जास्तीत जास्त कडक किंवा जबरदस्त शिक्षा करा, अशा मागण्या सर्व थरातून केल्या जातात. लोक अत्यंत असंवेदनशीलपणे म्हणतात की खून करायला, धमकी द्यायला, खंडणी मागायला, बलात्कार करायला यांना समजतं म्हणजे ही काय लहान मुलं आहेत का? ही मुलं जर मोठ्यांसारखे गुन्हे करतात तर त्यांना त्यांच्यासारख्याच कडक शिक्षा करा. त्यांना फाशी द्या, तुरुंगात सडायला ठेवा म्हणजे त्यांना अक्कल येईल. जो कायदा मुलांना गुन्हेगार मानत नाही त्या कायद्याला देखील पायदळी तुडवायला हे तथाकथित समाजाचे ठेकेदार मागे पुढे बघत नाही. आमच्यासारख्या अशा मुलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांकडे देखील दूषित नजरेनं बघितलं जातं. कडक शिक्षा करा असं म्हणणाऱ्या लोकांना मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो, अशा प्रकारच्या शिक्षा केल्या तर माणसं सुधारतात का? तसं असतं तर आतापर्यंत जग फारच सुंदर, पवित्र आणि स्वच्छ व्हायला हवं होतं. पण तसं झालंय का? गुन्हे व्हायचे थांबले आहेत का? आणि सामान्य लोकांना अभिप्रेत असलेली सुरक्षितता त्यांना मिळालेली आहे का? मुळात अल्पवयीन मुलं अशा पद्धतीचे ऑफेन्स करायला का प्रवृत्त होतात? त्यांना ते करायला भाग पडणारी परिस्थिती काय आहे याचा विचार आपण निःपक्षपातीपणे करणार आहोत की नाही? मुलांनी या वाटेला जाऊ नये म्हणून आपण त्यांच्या आयुष्यात काही रचनात्मक बदल करणार आहोत की नाही? की फक्त ते ऑफेन्स करतात आणि आमच्यासाठी ते धोकादायक आहे एवढाच आरडाओरडा करत आपण फक्त कडक शिक्षांची तरतूद करणार आहोत?
या पुस्तकाच्या माध्यमातून याच गोष्टी मला वाचकांपुढे मांडायच्या आहेत. सर्वांनी अंतर्मुख होऊन या मुलांच्या जगण्यापाशी थोडं थांबावं आणि विचार करावा हे आणि एवढंच मला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने या पुस्तकातली ओरिसाच्या मुलांची केस मला महत्त्वाची वाटते. समाजातल्या सर्वांचा सकारात्मक सहभाग असेल तर मुलांच्या आयुष्यात कसा प्रभावी बदल होतो हे या केसनं मला दाखवून दिलं. हेच या प्रकारातल्या सर्व मुलांच्या बाबतीत व्हावं असं या पुस्तकाच्या निमित्तानं मला वाटतं.
‘पहिला नंबरकारी’ घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://manovikasprakashan.com/index.php?route=product/product&product_id=1043