# मराठीचा प्रचार, प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महा वाणिज्यदुतांचा गौरव.

मुंबई: आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयी माहिती प्रसारित केली आहे. यासोबत विविध चित्रफिती तयार करून समाज माध्यमांद्वारे प्रर्दशित केल्या. हे करताना मराठी चित्रपटातील लोकप्रिय संवाद स्वत: बोलून त्याची संक्षिप्त चित्रफिती तयार केली. याच कार्यासाठी आज मुंबईतील अमेरिकीन राजदूत जे. रँझ, प्रवक्ते नीक नोव्हाक, वरिष्ठ अधिकारी रोना राठोड यांचा श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार, प्रसार करण्यासाठी महावाणिज्यदूतमधील प्रतिनिधी करत असलेले काम उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार श्री. देसाई यांनी यावेळी काढले.

दरम्यान, यापुढे अमेरिकेतील मराठी मुलांना महाराष्ट्रातून ऑनलाईन मराठीचे धडे देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास रॅँझ यांनी व्यक्त केला.

विविधतेत एकता व एकतेतून विविधता हा मुंबई व न्यूयॉर्क या शहरांना जोडणारा दुवा असून ही विविधता आपले सामाजिक जीवन संपन्न करेल आणि विविध संधी निर्माण करेल, असा विश्वास यावेळी उभयंतांनी व्यक्त केला.

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, आंतरराष्ट्रीय परस्पर संबंध तज्ज्ञ अभिषेक सूर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *