पुणे: ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक सदा डुंबरे यांचे आज गुरूवारी सायंकाळी पुण्यात एका खासगी इस्पितळात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी प्रा. शुभांगी, दोन मुले आणि कुटुंबीय असा परिवार आहे.
समकालीन राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारा एक परखड संपादक सदा डुंबरे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी पत्रकारितेत आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि लेखन शैलीमुळे प्रभावी ठसा उमटवणारे सदा डुंबरे यांची संपूर्ण वृत्तपत्रीय कारकीर्द (सलग ३६ वर्षे), सकाळ वृत्तपत्र समूहाशी जोडलेली होती.
सकाळमध्ये बातमीदार म्हणून कामाला सुरुवात केल्यावर काही काळ मुंबईत आणि सकाळ समूहाच्या कोल्हापूर आवृत्तीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यांची एकूण मोठी कारकीर्द सकाळच्या पुणे आवृत्तीत आणि मुख्यतः साप्ताहिक सकाळचे संपादक म्हणून राहिली. ते सलग एकवीस वर्षे साप्ताहिक सकाळचे संपादक होते.
फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञानातील पदवी संपादन केल्यावर त्यांनी पत्रकारितेच्या जगात प्रवेश केला. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर सकाळ वृत्तपत्र समूहात ते रुजू झाले.
सकाळचे संपादक श्री. ग. मुणगेकर, एस के कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रभाकर पाध्ये या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेत त्यांनी ठळक कामगिरी केली. सकाळचे चेअरमन प्रतापराव पवार यांनी आपल्याला स्वतंत्रपणे व चांगले काम करण्याची संधी सकाळ समूहाची सूत्रे त्यांनी घेतल्यानंतर मिळाली होती, असे दोन वर्षापूर्वी एका जाहीर समारंभात बोलताना सदा डुंबरे यांनी म्हटले होते.
इंग्लंडच्या थॉमसन फाउंडेशनचा अभ्यासक्रम, दिल्लीची प्रेस इन्स्टिट्यूट, मनिला येथील एशियन फाउंडेशन आणि पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट अशा नामवंत संस्थांमध्ये त्यांना अध्यापनाची विशेष संधी सकाळच्या माध्यमातून मिळाली. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या आमंत्रणावरून अमेरिकेचा पाच आठवड्यांचा अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केला. असोसिएशन ऑफ न्यूज पेपर्स या संस्थेने पोर्तुगालमध्ये आयोजित केलेल्या संपादकीय कार्यशाळेत आणि परिषदेत त्यांचा सहभाग होता. एक बातमीदार म्हणून महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध ठिकाणच्या वार्तांकनासाठी त्यांनी प्रवास केला.
राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच विकास, पर्यावरण, भाषा आणि साहित्य या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन विभागात ते अतिथी प्राध्यापक आणि बोर्ड ऑफ स्टडीचे अध्यक्ष होते. भारतीय जैन संघटना या स्वयंसेवी संस्थेत ते पाच वर्षे संचालक होते.
महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि प्रागतिक विचारांच्या संस्थांशी, संघटनांशी आणि चळवळीशी त्यांचा खूप निकटचा संबंध होता. परिसर, लोकविज्ञान संघटना, मुक्तांगण, प्रभाकर व कमल पाध्ये विश्वस्त निधी, लोक स्वतंत्रता संघटना,मिळून साऱ्याजणी अशा विविध संस्थांशी आणि त्या संबंधित असलेल्या चळवळीशी पत्रकार म्हणून सदा डुंबरे यांचे ऋणानुबंध होते.
रविवार सकाळ मध्ये कथा स्पर्धा आणि छायाचित्र स्पर्धा यासंदर्भात त्यांनी विशेष योगदान दिले होते ते संपादक असतानाच्या काळात साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना गेल्या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
सदा डुंबरे यांची पुस्तके:
१.आरस्पानी
२.प्रतिबिंब
३.दशक वेध
४.कर के देखो
५.देणारं झाड.
अलीकडेच त्यांच्या विविध लेखांचा समावेश असलेले ‘सदा सर्वदा,’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.