# मराठी ला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळावी.

मुंबई: मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारला ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी झालेल्या परिसंवादातील “मराठी भाषेला अभिजात दर्जा” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, डॉ. विजया वाड, प्रा. हरी नरके, माजी विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, प्रा. मिलिंद जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले. “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार” या विषयावरील परिसंवादात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, बुकगंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, स्टोरी टेल ॲपचे प्रसाद मिरासदार, युनिक फिचर्सचे आनंद अवधानी, पत्रकार रश्मी पुराणिक माजी सनदी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख, वक्ते म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उत्तरा मोने यांनी केले.

या दूरदृश्य प्रणाली परिसंवादात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, मराठी भाषाप्रेमी मान्यवर, पत्रकार, महाविद्यालयीन प्राध्यापक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघु शकतो आहोत. त्यामुळे मराठी भाषेला  केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली  पाहिजे. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहीलेला अग्रलेख ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती.  मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती  आहे. याचाही मुख्यमंत्रांनी उल्लेख केला. त्याचबरोबर शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची त्याचबरोबर सोप्या भाषेतील शब्द कोश तयार करण्याची  गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिजात भाषेसाठीचे सर्व पुरावे दिले –सुभाष देसाई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे केंद्राला सादर केले असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

श्री. देसाई पुढे म्हणाले, मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे तज्ज्ञ समितीने दिलेले आहेत. याबाबतचा निर्णय केंद्राकडून लवकरच होणे अपेक्षित आहे.  जगात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी मराठी ही दहाव्या क्रमांकावर आहे. जगभरात मराठी आजही शिकली आणि शिकवीली जाते आहे. नविन पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतील मजकुर मोठ्या प्रमाणात तयार करीत  आहे. याबाबत त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

मराठीला बळकट करावे – ॲड. अनिल परब: नव्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने मराठीचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत संसदीय कार्यमंत्री ॲड अनिल परब यांनी व्यक्त केले. सर्वपक्षीय सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सदस्यांची समिती केंद्राकडे न्यावी –सभापती रामराजे नाईक-निंबाळकर: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जावा. त्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती तयार करावी अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

श्री. निंबाळकर म्हणाले, मराठी भाषा मंत्री यांनी पुढाकार घेऊन माननीय पंतप्रधान यांची  भेटीची वेळ घ्यावी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमलेल्या सदस्यांचे शिष्टमंडळ केंद्रात घेऊन जावे. मराठी भाषेला मान सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

मराठीचा अभिमान बाळगा –नरहरी झिरवाळ: मराठी भाषेला गौरवशाली इतिहास आहे. प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठीचा अभिमान बाळगावा असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. मराठी भाषा दिनानिमित्ताने त्यांनी कुसुमाग्रजांना वंदन केले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

इंटरनेटच्या माध्यमातून सर्व ग्रंथालये जोडली जावीत- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मराठी भाषेचा प्रसार व्हावा आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व ग्रंथालये जोडली जावीत ज्यामुळे ग्रामीण भागातील वाचकांना चांगले साहित्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील, असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, मोबाईल, इंटरनेट यासारख्या नवमाध्यमांचा वापर करुन मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी दिशा दर्शक आराखडा तयार करावा लागेल. मराठी भाषेचा प्रचार कर्ण्यासाठी समाज माध्यमावर समुदाय तयार करावा लागेल. जागतिक स्तरावर मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी केले जाणाऱ्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे लागेल. लोकसाहित्यातील मराठी भाषेच्या अभ्यासासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अखत्यारित समिती तयार करण्यात यावी अशा सूचनाही डॉ.  गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यातून एक हजार कोटी पत्र केंद्राला पाठवावेत असे आवाहन जेष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांनी केले. मराठी भाषा ही केवळ जुनीच नाही तर सर्व श्रेष्ठ भाषा आहे यासाठी तज्ज्ञांनी केलेल्या कार्याची माहिती जेष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी दिली. भाषिक धोरणाचा अहवालावर शासनाने विचार करावा असे मत मराठी भाषा अभ्यासक व जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मराठी भाषेच्या संवर्धन या विषयी आपले विचार व्यक्त केले.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठी ही केवळ मातृभाषाच नसून ती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण हा दिवस स्वाभिमानाने बघू शकत आहोत. त्यामुळे मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जाच नव्हे तर सर्वोच्च भाषा म्हणून मान्यता मिळाली  पाहिजे. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेतून लिहिलेला अग्रलेख ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ याची दखल इंग्रजांना घ्यावी लागली होती.  मराठी भाषेला गौरवशाली संस्कृती आहे. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर शासकीय व्यवहारात सोपे शब्द वापरण्याची, सोप्या भाषेतील शब्दकोश तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्रवीर सावरकर यांनी मेयर या शब्दाला महापौर हा प्रतिशब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *