लॉकडाऊन मध्ये सर्वात जास्त हाल झाले ते गरीब स्थलांतरीत मजुरांचे व त्याच बरोबर कष्टकरी महिलांचे! ह्या काळात त्या महिलांनी जे भोगले, त्याला वाचा फोडली ती महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क समितीने घेतलेल्या वेबिनारने. त्यात ह्या महिलांनी आपल्या भळभळत्या जखमा सर्वांसमोर उघड्या केल्या. रेल्वे लाईनच्या बाजूला रहाणाऱ्या महिलांना सार्वजनिक संडास बंद असल्यामुळे इतरत्र जावे लागे. एकत्र जायला बंदी असल्याने, कितीतरी बायका मुली शारीरिक शोषणाच्या बळी झाल्या. लखनौमधले एक कुटुंब. एक मुलगा, एक मुलगी. मुलगा बारावीत, तर मुलगी बीएच्या दुसऱ्या वर्षाला. दुपारी कॉलेज सुटल्यावर ती एका पार्लरमध्ये काम करीत असे. आई एका कुटुंबात घरकाम करी. अचानक लॉकडाऊन झाल्यावर बाईचे काम सुटले, मुलीचे कॉलेज व पार्लर बंद झाले. पार्लरच्या मालकाने मुलीला वेश्या व्यवसायात येण्यास सुचविले. फोनवरून तो सतत तिच्यावर सक्ती करीत असे. तिचा नंबर सुद्धा त्याने कोणा-कोणाला दिला. त्यामुळे फोनवरून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली जाई. घाबरून ती फोन चार्ज करीत नसे. घरात एकच मोबाईल असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पहिला हक्क मुलाला दिला गेला व ती शिक्षणा पासून वंचितच राहिली…
कोविडच्या काळात मोदी सरकरने चार दिवसाची मुदत देऊन लॉकडाऊन सुरु केले. पण ते करायच्या आधी कसलाच विचार, कसलेच नियोजन केले नाही, ना परिस्थीतीचा आढावा घेतला. सगळे चार दिवसात बंद झाले; नोटा बंदी ही ४ तासातच झाली होती. ह्या वरून चार हा आकडा सरकारला फारच लाभदायक दिसतो आहे. हा आकडा लोकांचे जीवन मात्र उद्ध्वस्त करतो.
नोटबंदीच्या वेळी आणि ह्या लॉकडाऊन च्या वेळी देखील सर्वात जास्त हाल झाले ते गरीब स्थलांतरीत मजुरांचे व त्याच बरोबर कष्टकरी महिलांचे! ह्या काळात त्या महिलांनी जे भोगले, त्याला वाचा फोडली ती महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क समितीने घेतलेल्या वेबिनारने. त्यात ह्या महिलांनी आपल्या भळभळत्या जखमा सर्वांसमोर उघड्या केल्या. ह्या वेबिनारमध्ये हिजडे वगळता, घर कामगार, कचरा वेचक, बांधकामगार, वीटभट्टी कामगार, पथारीवाले, डबे धुणाऱ्या बायका, बाजार विक्रेत्या, भूमिहीन महिला, शरीर विक्रेत्या (वेश्या) ह्यांनी आपली दु:खे मांडली. हे सर्व असंघटीत मजूर आहेत.
टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगणाऱ्या आणि मेणबत्या, पणत्या लावून उजेड पाडणाऱ्या या सरकारने या गरिबांच्या घरात व आयुष्यातही काळोख पसरवला. ज्यांची पोट हातावर आहेत त्या गरिबाने या लॉकडाऊनच्या काळात कसं जगायचं याचा विचार ना कोणत्याही शासनाने केला ना त्यांच्यासाठी नियोजन केले. रस्त्यावर माणूस दिसला रे दिसला की पोलीस त्याला मार-मार मारीत. कारण ब्रिटीशांच्या वेळेचा कायदा ह्या वेळी अंमलात आणला गेला होता. आपण स्वतंत्र असताना आपल्याच राज्यात आपण गुलाम असतानाचा कायदा का वापरात आणला गेला?
मुंबईत पोलिसांच्या भीती पोटी, रात्री एक दोन च्या सुमारास कोळणी मढ वरून चोरून बाजार आणित. रात्रीचा थंडीतला प्रवास त्यांना त्रास देई. सर्दी खोकला होई. दवाखाने तर बंद. मग गरम पाणी पिऊन, घरगुती काढे करून त्या पीत. शाळेच्या बाजूला एका बाईचा इडलीचा बाकडा होता. ती इडल्या विकायची. पोलिसांनी तिचा बाकडाच तोडून टाकला आणि तिचा व्यवसाय बंद झाला. काहीच कामधंदा नसलेली बाई व तिची मुलगी चार दिवस उपाशी होती. असलेला पैसा घरभाडे, वीजबिल भरण्यात गेला. आता फुटकी कवडीही नसल्याचे ती सांगते. घरकाम करणारी बाई. तिचा नवरा आजारी पडला. त्याच्या औषधपाण्यासाठी तिने कर्ज काढले. नवरा मेला आणि लॉकडाऊन सुरु झाले. हातातली काम गेली, परिस्थिती इतकी वाईट की शिळ्या भाकऱ्या पाण्यात कुस्करून मुलांना खाऊ घातल्या. मोबाईल नसल्याने मुलांच्या शिक्षणाचे काय होणार हे टेन्शन.
एका बाईला मधुमेहाचा त्रास होता. डॉक्टर पेशंटला हात लावायचे नाहीत. बिपी तपासायचे नाहीत. डॉक्टर शोधता-शोधता बिचारी रिक्षातच मेली. ७२ वर्षाची सावित्रीबाई स्कीझोफ्रेनियाने आजारी. नवऱ्याने व मुलाने सोडून दिलेली. तिला कोर्टाकडून पोटगी मिळे. ह्या बंदच्या काळात कोर्ट बंद. अर्थात बाईला पैसे मिळणे बंद झाले. जेवणाचा डबा बंद, औषध बंद. बाईंचा आजार वाढला. उपासमारीने त्रस्त झालेल्या बाईने स्वत:चा हात कापून घेतला. नशिबाने संघटनेतला मुलगा तेथे पोहोचला आणि बाई वाचल्या. पण आता पुन्हा इस्पितळात दाखल करावे लागले. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, रेशनकार्ड नाहीत अशा हिजड्यांचे, वारकरी लोकांचे, कचरा गोळा करणाऱ्या, बांधकाम मजुरी करणाऱ्या बायांचे अतोनात हाल झाले.
शेतकरी म्हणून नोंद नसणाऱ्या परंतु शेती करणाऱ्या महिलेला तिचा माल विकता आला नाही आणि जो विकला तो अतिशय कमी किंमतीत! अनेक ठिकाणी पुरुषांची नोकरी गेल्यावर महिलांना संसाराचा भार आपल्या शिरावर घ्यावा लागला. रात्री दोन वाजेपर्यंत शिवणकाम करून एका महिलेने आपला संसार चालविला. कमाईवर निर्बंध आल्यावर आहे त्या पैशात घर चालवावे लागले. त्यामुळे घरात चिडचिड वाढत गेली. महिलेलाच शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागले. त्यांच्यावरच्या मानसिक ताणात वाढ झाली. त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला. ज्यांना फिट्स येत होती त्यांच्या फिट येण्याच्या प्रमाणात वाढ झाली. डोक्यात मुंग्या येणे, डोके दुखणे, मासिकपाळीत अनियमितता येणे असे मानसिक ताणाचे परिणाम दिसून आले. बिपी, शुगर सारखी दुखणी बायांनी अंगावर काढली. कारण तपासायला गेल्यास कोरोनाची टेस्ट करावी लागत असे म्हणून दवाखान्याची पायरी त्या चढल्याच नाहीत.
वीटभट्ट्यात ५ ते ६ लाख मजूर काम करतात. हे सर्व स्थलांतरीत मजूर असतात. ५०० ते १००० किमी वरून ते येतात. पहाटे ३ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ते कामे करतात. २० ते ३० हजारात संपूर्ण कुटुंब वर्ष काढते. वीटभट्ट्या बंद झाल्यामुळे त्यांची मजुरी बंद झाली. गावात परत गेलेल्या मजुरांना गावात प्रवेश मिळेना. धार्मिक स्थळांसमोर बसून व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या २५ ते ३० लाख आहे. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांसमोर बसून त्या व्यवसाय करतात. ह्या मध्ये फुले विकणे, प्रसादाचे साहित्य विकणे, जोगवा मागणं, चप्पल सांभाळणे अशी अनेक कामे ह्या करतात. धार्मिक स्थळे बंद झाल्यामुळे आणि दुसरा कोणताच व्यवसाय करता येत नसल्याने त्यांचे फार हाल झाले. घरातल्या सर्व वस्तू विकून झाल्यावर जगण्यासाठी मायक्रोफायनान्स कडे वळण्या पलीकडे दुसरा मार्गच उरला नाही.
बचत गटाच्या बायका अंगणवाडीत जेवण बनवून देत. त्यांच्या कडून ही योजना काढून घेऊन कंपन्यांना दिली गेली. त्यामुळे या बायकांची रोजंदारी गेली. ह्या बचत गटात असलेल्या वयस्क, विधवा, परितक्त्या बायांचे खूप हाल झाले. झोपडपट्टी भागात दारुड्या नवऱ्याला बाईने पैसे नाही दिले की तिला चांगले बदडून घराबाहेर काढलेच समजा. अशाच एका बाईवर नवऱ्याने राग काढला व तिचा अंगठा वरवंट्याने चेचला. शेतकऱ्यांकडे मजुरी द्यायला पैसा नसल्याने तयार झालेली पिके काढता आली नाहीत व पाऊस आल्याने ती शेतातच कुजली. बायांना काम नाही म्हणून मजुरी नाही; जे शेतकरी कारखान्यात होते त्याचे कारखाने बंद झाल्यामुळे ते ही बेकार झाले. अशा परिस्थितीत विजेची बिल मात्र येतच होती. एकल महिलांचे या काळात खूप हाल झाले.
कचरा वेचणा ऱ्या बायका पहाटे तीन वाजता उठून घरातले काम आटोपून कचरा वेचायला लांबवर चालत जात. सोबतीला मुलाला किंवा नवऱ्याला घेऊन जात. परत येताना पुरुष एकटेच असत. अशा वेळी पोलीस त्यांना मजा मारायला गेला होतात काय असे म्हणत काठीने चांगले चोपून काढीत. आता लॉकडाऊन संपले असले तरी मनपा कंत्राटी पद्धत आणणार असल्याने त्यांच्या मागचे शुक्लकाष्ट अजून संपलेले नाही.
लॉकडाऊनच्या काळात वेश्याव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे ह्या बायांचेही खूप हाल झाले. आता सर्व सुरु झाले असले तरी लोकांकडे पैसा नाही काय मिळेल त्या पैशात धंदा करावा लागतो. त्यांना सुद्धा गिऱ्हाईकांचे हात-पाय धुवा, त्यांना सॅनिटाइज करा स्वत:ला करा अशी काळजी घ्यावीच लागते.
रेल्वे लाईनच्या बाजूला रहाणाऱ्या महिलांना सार्वजनिक संडास बंद असल्यामुळे इतरत्र जावे लागे. त्यात एकत्र जायला बंदी असल्याने, कितीतरी बायका मुली शारीरिक शोषणाच्या बळी झाल्या. लखनौमधले एक कुटुंब. एक मुलगा, एक मुलगी. मुलगा बारावीत, तर मुलगी बीएच्या दुसऱ्या वर्षाला. दुपारी कॉलेज सुटल्यावर ती एका पार्लरमध्ये काम करीत असे. आई एका कुटुंबात घरकाम करी. अचानक लॉकडाऊन झाल्यावर बाईचे काम सुटले, मुलीचे कॉलेज व पार्लर बंद झाले. पार्लरच्या मालकाने मुलीला वेश्या व्यवसायात येण्यास सुचविले. फोनवरून तो सतत तिच्यावर सक्ती करीत असे. तिचा नंबर सुद्धा त्याने कोणा-कोणाला दिला. त्यामुळे फोनवरून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली जाई. घाबरून ती फोन चार्ज करीत नसे. घरात एकच मोबाईल असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पहिला हक्क मुलाला दिला गेला व ती शिक्षणा पासून वंचितच राहिली.
ज्या मुलांची यौनिक ओळख झालेली आहे (हिजडे म्हणून) अशी बरीचशी मुल पालकां समवेत रहातात. पण पालकांना ते मंजूर नाही. अशी बरीचशी मुल आहेत की त्यांची यौनिक ओळख झालेली नाही किंवा पालकांना ते माहित नाही. अशा मुलांवर त्यांच्या गावच्या सरपंचाने किवा इतरांनी लैंगिक अत्याचार केले.
ज्या महिलांनी घर चालविण्यासाठी मायक्रोफायनान्स कडून कर्ज घेतले ती लोक ह्या महिलांना फोन वरून धमकी द्यायचे, त्यांना जप्तीची भीती घालायचे, दुसऱ्यांदा कर्ज मिळणार नाही, चक्रवाढ व्याज द्यावे लागेल, रेशन मिळणार नाही अशा तऱ्हेने घाबरवीत. अशा घाबरलेल्या महिलांना रात्र-रात्र झोप येत नसे. कर्ज फेडण्यात नवऱ्याची मदत नाही. तो म्हणे कर्ज तू काढलेस आता फेडायची जबाबदारी देखील तुझीच
ह्या काळात सर्वात जास्त त्रास भोगला तो मुस्लिम स्त्रियांनी. बरेली व लखनौ मधल्या छोट्या-छोट्या गल्ल्यात बनारसी साडी पासून ते जरदोशी, चिकनकारी ह्या सर्व कामात ह्याच महिला आहेत. तसेच चुडीचा धंदा, पॉटरीचा धंदा ह्या मध्ये सर्व मुस्लिम कारागीरच आहेत. नोटबंदी पासून हे व्यवसाय ठप्पच झाले होते ते आता संपल्यातच जमा आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम भाजीवाल्यांवर तिकडच्या एम.पी. व एम.एल.ए. नी बहिष्कार घातला. जाती-धर्माचे स्तोम माजविले गेले व मुस्लिमांना लक्ष केले गेले.
मुजफ्फुर नगर स्टेशनवर अर्बिना खातून ही तरुणी मरून पडलेली व तिचे एक वर्षाचे मुल तिच्या दुपट्ट्या बरोबर खेळताना सर्वांनी टी.व्ही. वर पहिले. त्या निष्पाप मुलाला आपली आई मेली आहे ते ही कळत नव्हते रेल्वेच्या प्रवासात भुकेने तिचा जीव गेला होता. नरेगामध्ये बायकांची कामे कमी करून पुरुषांना दिली गेली. एवढेच नव्हे तर श्रमिक ट्रेन मधून १० लाख बायकांना खाली उतरवले गेले. अजूनही त्या गाडीत बायकांना चढण्याची परवानगी नाही.
ह्या काळात घरगुती हिंसाचारात अफाट वाढ झाली तर लैंगिक छळाने सीमा ओलांडल्या. यौनिक हिंसा, शारीरिक हिंसेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नको असलेला गरोदरपणा लादला गेला. कॅम्पमधून गर्भ निरोधक गोळ्या आणल्या म्हणून बायकांनी नवऱ्याचा मारही खाल्ला आहे.
ह्या पॅन्डेमिक मध्ये किती लोक उपासमारीने मेले, किती कुपोषणाने मेले, याचे आकडे बाहेर आले नाहीत. जे मेले ते कोरोनाने मेले म्हणून सांगितले गेले. स्थलांतरीत मजूर किती आले त्याचे आकडे सरकारला माहित नाहीत, किती मेले त्याचे आकडे नाहीत. आपल्या दयाळू पंतप्रधानांना मोरांची काळजी आहे पण जनतेच काय?
-डॉ.मीनल कुष्टे
मोबाईल: 9604207322